दत्ता मारुलकर

Datta Marulkar
संगीत समीक्षक आणि लेखक

मृत्यू दिनांक: १२ फेब्रुवारी २००८

आता ती मैफलही सुनीसुनी!
बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला.

माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अ‍ॅम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते.

‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.

कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.

नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही.

एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई.

दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे.

दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

#DattaMarulkar




Listing
d - १२ फेब्रुवारी २००८
LS - Dead