निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे.
न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. महादेव गोविंद रानडे यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर अनेक देशव्यापी चळवळींच्या मुळाशी त्यांची प्रेरणा होती. अनेक चळवळींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. ‘मराठे शाहीचा उदय व उत्कर्ष’ या विषयावर चिकित्सक अभ्यास करणारे न्या. रानडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या सार्वजनिक कार्याला, त्यातील चळवळींना गती तर दिलीच पण एका उच्च स्तरावर राहून या चळवळींना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला !
या सर्व चळवळींचा रथ पुढे नेतांना त्यांनी समाजाला आधुनिक जगाची ओळख करून दिली. विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रूजवायचा प्रयत्न केला. तसेच बालविवाह आणि जातीयता या समाज विघातक रूढींविरोधी जागृती निर्माण करण्याचं कार्य न्या. रानडे आपल्या चळवळींद्वारे करीत असत. ‘राईज ऑफ मराठा पॉवर’ हे त्यांचे इंग्रजी पुस्तक विशेष गाजले. ‘एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स’ हे एका अर्थतज्ज्ञाने लिहिलेले उत्कृष्ट पुस्तक म्हणून लोकप्रिय झाले.
न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे हे जसे निःस्पृह न्यायाधीश म्हणून मान्यता पावलेले होते तसेच ते अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत. ‘हिमालयाप्रमाणे भव्य आणि उत्तुंग’ असे महात्मा गांधींनी त्यांचे वर्णन केले होते. १६ जानेवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले.
## न्या. महादेव गोविंद रानडे