मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर पहिल्या इंग्रजी शिक्षित पिढीतील अत्यंत विद्वान व्यक्ती म्हणून प्रसिध्द होते. अनेक भारतीय आणि परदेशी भाषा आत्मसात केलेल्या बाळशास्त्रींनी सुधरणावादी धोरण स्वीकारुन आपल्या अल्पायुष्यात लोकशिक्षण व ज्ञानप्रसार यांसाठी आपली विद्वत्ता कारणी लावली. केवळ भारतीयच नव्हे, तर ब्रिटिशांनाही ज्यांच्याविषयी आदर होता, अशा मोजक्या लोकांत बाळशास्त्रींचं स्थान खूप वरचं होतं.
बाळशास्त्रींचा जन्म रत्नागिरी जिल्हयातील पोबुर्ले या गावी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर मुंबईत येऊन त्यांनी इंग्रजी व संस्कृत या भाषा विषयांशिवाय गणित व शास्त्रातही प्राविण्य मिळवलं. गुजराथी , बंगाली, कानडी, हिंदी, तेलगू, फार्शी, अरबी, फ्रेंच व ग्रीक या भाषांवरदेखील त्यांचं प्रभूत्व होतं. रॉयल एशियाटिक सोसायटी च्या कार्यात भाग घेणारे बाळशास्त्री पहिले एतद्देशीय विद्वान होते. एलफिन्स्टन कॉलेजमध्ये गणित व खगोलशास्त्र हे विषय ते शिकवत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या विद्वत्तेला साजेशी अनेक कामं केली.
लोकशिक्षण आणि ज्ञानप्रसार हे दोन उद्देश समोर ठेवून बाळशास्त्री जांभेकरांनी इ.स. 1832 मध्ये दर्पण` हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरु करुन मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा पाया घातला. तसंच त्यांनी 1840 साली `दिग्दर्शक` हे पहिलं मराठी मासिकही सुरु केलं. बाळशास्त्रींनी वृत्तपत्र व मासिकांतून प्रामुख्याने सुधारणावादी दृष्टिकोन मांडून त्याचा पुरस्कार केला. केवळ विचार न मांडता ते प्रत्यक्षात आणण्यांचं कर्तृत्व त्यांच्यात होतं. ख्रिश्चन घरात राहिल्यामुळे वाळीत टाकण्यात आलेल्या एका हिंदु मुलाला सनातन्यांचा विरोध डावलून स्वधर्मात आणण्याची व्यवस्था त्यांनी केली होती.
बाळशास्त्रींनी `नीतिकथा`, सारसंग्रह, भूगोलविद्या , द हिस्टरी ऑफ इंडिया, द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया` अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. रॉयल एशियाटिक सोसायटी` च्या त्रैमासिकातून भारतीय शिलालेख व ताम्रपट यांविषयी त्यांनी शोधनिबंध प्रसिध्द केले. बाळशास्त्रींची विद्वत्ता ब्रिटिशांच्याही नजरेत भरली. 1840 साली ब्रिटिश सरकारतर्फे त्यांना `जस्टीस ऑफ द पीस` हा किताब देण्यात आला. आपल्या अल्पायुषी कारकीर्दीत मराठी पत्रकारिता आणि अनेक विद्याप्रांतांत न पुसता येण्याजोगा ठसा उमटवणारे अग्रणी विद्वान म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचं कर्तृत्व अजरामर ठरलं.