मागच्या पिढीत मासिक ही संकल्पना अतिशय लोकप्रिय होती आणि या मासिकातून ज्या ज्या लेखकांचे लेख अथवा कथा प्रसिद्ध झाल्या ते लेखक, लेखिका त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरल्या. त्यातील एक नाव म्हणजे गिरिजा उमाकांत कीर.
गिरिजाबाईंचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी धारवाड येथे झाला. पूर्वाश्रमीच्या त्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली.
किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवातूनच लिहिले गेले आहे.
‘गिरिजाघर’, ‘देवकुमार’, ‘चांदण्याचं झाड’, ‘चंद्रलिंपी’, ‘चक्रवेद’, ‘स्वप्नात चंद्र ज्याच्या’, ‘आभाळमाया’, ‘आत्मभाग’, ‘झपाटलेला’ इ. त्यांच्या कादंबर्याही लोकप्रिय आहेत. ‘गाभार्यातील माणसं’, ‘जगावेगळी माणसं’, ‘कलावंत’, ‘साहित्य सहवास’ ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरेच लेखन केले आहे. त्यांच्यातील लेखिका ही शृंगारिक तशीच गंभीर आणि अंतर्मुखही दिसते. तसेच त्या उत्कृष्ट कथाकथनही करीत असत.
त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले “जन्मठेप” हे पुस्तक त्यांनी ६ वर्षे येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून लिहिले आहे.
गिरीजा कीर यांचे मराठीसृष्टीवरील लेख
जेष्ठ लेखिका गिरिजा कीर (5-Feb-2019)
ज्येष्ठ लेखिका गिरिजा उमाकांत कीर (1-Nov-2019)
## Girija Keer