ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे. हा पुरस्कार ‘पॉप्युलर प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘निरर्थकाचे पक्षी’ या कवितासंग्रहाला मिळालेला असला, तरी तो त्यांच्या आजवरच्या एकूणच कवीतिक कर्तृत्वाला मिळालेला पुरस्कार आहे, असं समजायला हरकत नाही.
कारण ‘वेणा’ या पहिल्याच कवितासंग्रहापासून प्रखर स्त्री जाणिवेची कविता लिहिणाऱ्या नीरजा ‘निरर्थकाचे पक्षी’ या चौथ्या कवितासंग्रहात मात्र समकालाला आणि समकालातील प्रश्नांना संपूर्ण जाणिवे-नेणिवेसह भिडलेल्या दिसतात. अर्थात तरीही स्त्री, स्त्री-संवेदना आणि स्त्री वेदना हीच नीरजा यांच्या एकूण कवितेची त्रिसूत्री स्वतंत्र सर्जनशील वाट आहे. त्यातूनच त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असलेल्या विद्रोहाचा-उपहासाचा उगम झालेला आहे. हा विद्रोह केवळ पुरुषाच्याविरोधात नाही, तर एकूणच परंपरावादी विचारसरणीच्या विरोधातला आहे आणि तो खूपच धीटपणे त्यांच्या कवितेतून व्यक्त झालेला आहे. त्यांच्या कवितेतला हा धीटपणा त्यांना आपल्या भवतालातूनच मिळालेला आहे.
मसुंचं म्हणजे वडिलांचं वास्तव्य नोकरीनिमित्ताने मनमाडला असताना त्यांच्या मागे नीरजाच्या आई म्हणजे विभावरी पाटील आपल्या दोन मुलींचा समर्थपणे सांभाळ करत होत्या. एवढंंच नाही, तर विभावरी पाटील यांचा आपल्या आगरी समाजातील महिलांशी मोठा संपर्क होता. त्यांची अनेक लोकगीतंही त्यांनी संकलित केली होती. आईच्या या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा आणि तिने जमा केलेल्या लोकवाङ्मयातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर नाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला आहे. पुरुषाशिवायही बाई किती भक्कमपणे उभी राहू शकते, हे त्यांना यातूनच उमगलं. नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर.
विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर ‘सावित्री’ ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वषीर् त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कवीसंमेलनात झाला… आणि आज नीरजा मराठीतील एक महत्त्वाच्या कवयित्री म्हणून प्रसिध्द आहेत. मात्र कवितेने यश दिलं म्हणून त्या तिथेच थांबल्या नाहीत. नंतरतच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर कथालेखन केलं. या कथांतूनच त्यांचे ‘ओल हरवलेली माती’ आणि ‘जे दर्पणी बिंबले’ असे दोन कथासंग्रह सिध्द झाले आहेत.
अनेकदा सर्जनशील लेखक कुठल्याही संस्थात्मक जबाबदाऱ्यांमध्ये अडकत नाही. परंतु नीरजा यांनी आपली ही सामाजिक जबाबदारी झटकलेली नाही. ‘ग्रंथाली’ आणि ‘सानेगुरुजी ट्रस्ट’च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी असून या संस्थांच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. म्हणूनच अशा कवयित्रीच्या कवितासंग्रहाला ‘केशवराव कोठावळे’ पुरस्कार मिळणं हा केवळ त्यांच्या कवितेचा गौरव नाही, त्यांच्या वैचारिकतेचाही गौरव आहे.