साठच्या दशकात उदयास आलेल्या लेखक, विवेचनकार आणि अनुवादकारांच्या पिढीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कऱ्हाडे यांचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. मराठी साहित्याबरोबरच इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, संस्कृत, कन्नड, उर्दू, रशियन भाषांचे जाणकार म्हणून सदा कऱ्हाडे परिचित होते. मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषयांमध्ये एम.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर विलेपार्लेच्या साठय़े महाविद्यालयात मराठीचे अध्यापन त्यांनी केले.
साडेचार दशकांच्या प्रदीर्घ अध्यापनादरम्यान सदा कऱ्हाडे यांचे चौफेर लेखन सुरूच राहिले. एक नोकरपेशा प्राध्यापक म्हणून काम करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. मराठीच्या प्रसाराबरोबरच अन्य विदेशी भाषांमधील कसदार साहित्यकृती मराठी मनाला वाचता आल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच असंख्य वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करताना त्यांनी भाषिक समन्वयाचा एक व्यापक दृष्टिकोन सातत्याने बाळगला.
मायबोलीवर प्रभुत्व असलेल्या प्रा. सदा कऱ्हाडे यांनी फ्रेंच, रशियन आणि उर्दू भाषाही तेवढय़ाच आत्मीयतेने आत्मसात केली. विशेषत: भारताच्या रशियाशी असलेल्या सांस्कृतिक संबंधांवर त्यांनी टाकलेला प्रकाश अभ्यासपूर्ण ठरला. अनुवादित ग्रंथांच्या लेखनात त्यांचा हातखंडा होता. मार्क्सवाद, बुद्धवाद, आंबेडकरवाद, अण्णाभाऊ साठे यांचे वाङ्मयीन योगदान यावर विवेचनात्मक विविधांगी लेखन करणाऱ्या सदा कऱ्हाडेंनी समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही विशेष ग्रंथलेखन करून अष्टपैलुत्व सिद्ध केले. त्यांच्या साहित्यसंपदेतील ‘गावकुसाबाहेरची वस्ती’, ‘सुरवंट’, ‘सहा डिसेंबर १९९२’ या कादंबऱ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
धुळे १९९० साली झालेल्या सोळाव्या अस्मितादर्श मेळाव्याचे अध्यक्षपद, १९९३ साली ‘दलित-कलम’ या साहित्य अधिवेशनाचे अध्यक्षपद, सोलापूर येथे झालेल्या चौथ्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि अमरावतीत १९९५ साली झालेल्या जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
## Prof. Balkrishna alias Sada Karhade