नाटयसमीक्षक, नाटककार, चरित्रकार असलेले वसंत शांताराम देसाई यांनी नाटयक्षेत्रात बरेच कार्य केलेले आहे. वसंत देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ साली इंदूर येथे झाला. त्यांचे वडील हे होळकर कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९२८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर वसंत देसाई यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच काळात मराठी रंगभूमी आणि बालगंधर्व हे अवघ्या महाराष्ट्रात गाजत होते, नाटक आणि बालगंधर्व यांच्याबद्दल अतिशय ओढ वाटून नाटक कंपनीतील अनेक नटांशी आणि नाटककारांशी त्यांनी ओळख करुन घेतली. त्याच काळात एल. एल. बी. ची पदवीही त्यांनी मिळविली आणि पुण्यात वकिली सुरु केली. परंतु रंगभूमीचा त्यांनी ध्यास घेतला होता. १९२७ मध्ये वसंत देसाईंना बालगंधर्व यांनी नाटक लिहायला सांगितले. विधिलिखित‘ हे पहिले वसंतरावांनी लिहिले बालगंधर्वानी ते रंगभूमीवर आणले. त्यानंतर ‘अमृतसिध्दी‘ हे नाटक तर त्यांनी लिहिलेच परंतु त्यातील, पदेसुध्दा त्यांनीच लिहिली. ही पदे आणि नाटक दोन्हीला चांगलीच प्रसिध्दी मिळाली. गडकरींच्या प्रेमसन्यासासाठी सुध्दा त्यांनी पदे लिहिली होती. उपवनी गात कोकीळा, सखे मी मुरारी‘ ही हिराबाई बडोदेकरांनी गायलेली पदेसुध्दा वसंतरावांनीच लिहिली होती. वसंत देसाई यांनी नाटयविषयक, रंगभूमीविषयक बरेच लेखन केले आहे. ‘कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी‘, कलेचे कटाक्ष, ‘मखमलीचा पडदा‘ नट, नाटक आणि नाटककार, इत्यादी पुस्तके तर विद्याहरणाचे अंतरंग , खाडिलकरांची नाटयसृष्टी इत्यादी नाटयसमीक्षा आणि कलावंतांच्या सहवासात , बालगंधर्व व्यक्ती आणि कला, रागरंग इत्यादी ग्रंथांतून त्याचे लेखन प्रकाशित झालेले आहे. विष्णूदास भावे, किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, गडकरी, गणपतरव जोशी, कोल्हटकर, केशवराव भोसले. भास्करबुवा बखले, गणपतराव बोडस केशवराव दाते, दिनानाथ मंगेशकर, हिराबाई बडोदेकर, ज्योत्सना भोळे अशा अनेक कलावंतांवर त्यांनी लेखन केलेले आहे. अंशीच एकाची गोष्ट हे त्यांचे आत्मचरित्र चांगले गाजले. बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. अशा या श्रेष्ठ रंगधर्मीचे २३ जून १९९४ रोजी निधन झाले.
वसंत देसाई यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2018)
नाटककार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2021)