विचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक असणार्या राजाराम भालचंद्र पाटणकर म्हणजेच रा. भा. पाटणकर यांचा जन्म खामगाव येथे आजोळी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याकडे ९ जानेवारी १९२७ रोजी झाला.
रा. भा. पाटणकरांचे वडील भा. ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. रा. भा. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण रूंगठा हायस्कूल मध्ये व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक हायस्कूलमध्ये झाले. बी. ए. व एम. ए. पर्यंतचे त्यांचे शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात झाले. त्यानंतर शासकीय महाविद्यालयात ते अध्यापन करू लागले. या काळात भावनगर अहमदाबाद, भुज आणि अमरावती येथील महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. १९६० मधील ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी संपादन केली.१९६४ साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. निवृत्तीपर्यंत ते इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते. पाटणकरांनी बरेच लेखन केले.
त्यांचा पहिला लेख ‘पुन्हा एकदा एकच प्याला’, नवभारत मध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘एरिअल’ या टोपण नावाने ते कथा कवितालिहित असत. परंतु पाटणकरांचा व्यासंगाचा विषय सौंदर्यशास्त्र हा होता. ‘सौंदर्य मीमांसा’, ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र ः एक भाष्य’, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इ. तत्त्ववेत्यांनी स्वीकारलेला सिद्धांत पाटणकरांनी या ग्रंथातून स्पष्ट केला आहे. कमल देसाई यांचे ‘कथाविश्व’, ‘मुक्तीबोधांचे साहित्य’, कथाकार शांताराम’ या तीनही लेखकांच्या लेखांवर पाटणकरांनी केलेली समीक्षा आपल्याला वाचायला मिळते. तसेच या पुस्तकात लिहिलेल्या प्रस्तावना मानवी आणि तात्विक भूमिका स्पष्ट करणार्या आहेत. सांस्कृतिक परिवर्तनाचा संदर्भ देणारे ‘अपूर्ण क्रांती’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.
`सौंदर्य मीमांसा` हा त्यांचा ग्रंथ मराठी समीक्षा क्षेत्रातील मैलाचा दगड मानला जातो. साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच `अपूर्व क्रांती` या पुस्तकास महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. तत्वज्ञान, आर्थिक इतिहास, इंग्रजी साहित्य या विषयात त्यांना विशेष रस होता. मुंबई विद्यापीठाबरोबरच गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले होते. `इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया` डयुरिंग ब्रिटिश रुल` ही पुस्तके त्यांची अपूर्ण राहिली आहेत.
२४ मे, २००४ रोजी त्यांचे निधन झाले.