उर्मिला भूतकर

Urmila Bhootkar


७३ वर्षीय उर्मिला भूतकर या शासनाच्या बांधकाम विभागाच्या निवृत्त अधिकारी असून, सध्या त्या ठाणे जिल्ह्यातील कळवा विभागात वास्तव्यास आहेत. शिक्षण, वाचन याची उपजत गोडी असणार्‍या उर्मिला भूतकरांना साहित्याची विशेष आवड आहे, त्या कवयित्री म्हणून प्रसिद्ध असून, कोणत्याही प्रसंगावर, व्यक्तीवर घटनेवर केवळ ३-४ मिनिटांमध्ये काव्यरचना करतात. “उर्मी” हा त्यांचा एकपात्री प्रयोग महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय ठरला.
शासनाच्या तसंच खासगी सोहळ्यांच्या समारंभाप्रसंगी त्यांना विशेष अतिथी म्हणून पाचारण करण्यात येते कारण शब्दांची सुयोग्य यमक जुळवून, त्यांच्याकडून उत्तमोत्तम कविता, चारोळ्या व गीतांची निर्मिती होते. आजतागायत त्यांच्या साहित्याची दखल विविध पातळीवर घेण्यात आली असून, त्यांचा यथोचित सन्मान ही करण्यात आला आहे. त्यांना साहित्याचे पुरस्कार, तसंच महापौर पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर त्यांच्या काव्य रचनांना दाद गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गायिका आशा भोसले, उद्योगपती मुकेश अंबानी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शरद पवार, मनोहर जोशी आदी समाजातील प्रख्यात मान्यवरांकडून मिळाली आहे.