कथा, कविता, लेख असं साहित्यात मोलाचं योगदान देणार्या सौ. सुनिती काशीकर यांनी तापर्यंत दै. ठाणे वैभव, दै. सन्मित्र, दै. लोकसत्ता, अशा वृत्तपत्रांमधून कथा, कविता, लेख असं विपूल साहित्यलेखन केलं आहे. “अनुराधा”, “अनुराग”, “धनुर्धारी”, “रुचकर”, “कथाश्री”, “चारचौघी” तसेच विविध मासिकांमधून “गुरुदक्षिणा”, “ऋणानुबंध, “आशिर्वाद”, “कळीने फुललेच पाहिजे”, “मुन्ना”, “जिद्द”, “सूड”, “सावट”, आदी कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठी कथांचे हिंदीत व हिंदीचे मराठीत अनुवाद प्रसिद्ध आहेत. “ज्ञानदीप” हे मराठी कथांचे निबंध-व्याकरण पुस्तक १९६४ साली प्रसिद्ध झाले. “दीपस्तंभ”, “चांदण्या” या कवितासंग्रहात काही कविता प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यसंमेलनात “झुला” ही कविता निवडली गेली. “भावरंग” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. भारतीय जनभाषा प्रचार समिती तर्फे “होळी” काव्यसंग्रहात पुरस्कार प्रदान. तसेच उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. “अमूल्य भेट” व “पिंकी” हे बालसाहित्य कथासंग्रह प्रसिद्ध झाले. “छलांग” चे मराठीत अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
मनातील ठाणे :
आपल्या मनातील ठाण्याविषयी सौ. सुनिती काशीकर अगदी मन मोकळेपणाने बोलतात. त्या म्हणतात की, त्यांच्या जन्मापासूनच ठाणे अनुभवलं आहे. पूर्वीचं ठाणं हे तलावाचं ठाणं, वेड्यांचं हॉस्पिटल असलेलं ठाणे म्हणून ओळखलं जाई. आजचं ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं एक महानगर म्हणून ओळखलं जात आहे. औद्योगिक विकास, वाहतूक दळण-वळणाच्या सोयी, तंत्रज्ञानातील विकास या अधुनिकतेबरोबरच कला, संस्कृती, सामाजिक जाणीवा या मूल्यांचं जतन करणारं आजचं ठाणे! उद्या न
्यूयॉर्क, लंडन, पॅरिस या आणि अशा अनेक आंतरराष्ट्रीय शहरांप्रमाणेच ठाणे ओळखले जाईल असं त्यांना वाटतं. शेवटी जाता जाता, “ठाण्यातील संस्कृती, परिसर आणि इथली माणसं यांमुळेच माझं लेखन बहरलं” असं सांगायलाही त्या विसरत नाहीत.
पुरस्कार : सौ. सुनीती काशीकर ह्यांच्या साहित्यातील कामाबद्दल “गुणीजन” पुरस्काराने त्यांना ठाणे महानगरपालिकेने सन्मानित केले आहे.