जन्म : २६ ऑगस्ट, १९२२
मृत्यू : २९ मे, २०१०
गणेश प्रभाकर प्रधान हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ग प्र प्रधान याच संक्षिप्त नावाने ते सुपरिचित होते.
ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते. पुण्यात विद्यार्थिदशेतच ते ना. ग. गोरे व एस.एम. जोश्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी १९४२च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते. ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयांत इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद भूषविले.
२००९ साली ‘लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक’ साठी त्यांना राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला.
समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधानांच्या जीवनकार्य आणि समाजसेवेचा परिचय देणार्या लघुपटाची निर्मिती केली आहे