रघुनाथ पंडित

Raghunath Pandit


मराठी पंडित कवी. त्याची चरित्रविषयक माहिती निश्चित स्वरुपात उपलब्ध नाही. तो कोण असावा, हयाबद्दल पाच मते आढळतात ः (1) तो कारवारकडील चंदावर गावचा सारस्वत ब्राम्हण असावा. (2) तो तंजावरचा असावा आणि मोरोपंतांचा समकालीन असावा. (3) तो मुळात रायगड जिल्हयातील चौलचा आणि त्याचे आडनाव मनोहर. तो पुढे कर्नाटकात स्थायिक झाला. त्याने वैद्यविलास, कविकौस्तुभ, छंदोरत्नावलि, चिकित्सामंजरी व नाडीज्ञानविधी ही साहित्यविषयक व वैद्यकविषयक प्रकरणे संस्कृतात लिहिली. प्रसिध्द दमयंतीस्वयंवरही त्यानेच लिहिले. (4) तो शिवाजी महाराजांचा अष्टप्रधानांपैकी एक असून `पंडितराव ` हया पदावर होता. (5) शिवकालातील राजव्यवहारकोश लिहिणारे रघुनाथ नारायण हणमंते हेच रघुनाथपंडित होत. दमयंतीस्वयंवर किंवा नलोपाख्यान हे त्यांनीच लिहिले. हया सर्व मतांचा विचार करुन , शं. गो. तुळपुळे हयांनी हा कवी तंजावरचा होता व तो राजकारणपटूही होता, असा निष्कर्ष काढला आहे.