अनिल मेहता यांचा जन्म ३ मार्च १९४१ रोजी निपाणी येथे झाला.
पुस्तकविक्री व्यवसायाचा अर्धशतकाचा अनुभव गाठीशी असलेले आणि प्रकाशनाची चार दशकांची यशस्वी वाटचाल करणारे अनिल मेहता मूळचे निपाणीचे. अनिल मेहता शिक्षणासाठी पुण्यात आले. बी.कॉम. झाल्यावर वेगळे काही करण्याच्या उद्देशातून कोल्हापूरला आले. देवचंद शहा यांनी जागा मिळवून देण्यापासून ते भांडवल उभे करण्यापर्यंतची मदत केली. १९६५ मध्ये कोल्हापूरला ‘अजब पुस्तकालय’ नावाचं दुकान अनिल मेहता आणि त्यांचे बंधू उल्हास मेहता चालवत असत.
आनंद यादवांच्या ‘माळ्यावरची मैना’ या कथासंग्रहाने मेहता पब्लिकेशनचा प्रवास सुरू झाला. आत्तापर्यंत ४५०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विविध भाषांमधील पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी बंगाली, गुजराती, हिंदी, कानडी या भाषांमध्ये देखील पुस्तके करायला सुरुवात केली. रणजीत देसाई, वि.स. खांडेकर, व.पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, आशा बगे, राजन गवस, दया पवार अशा अनेक मातब्बर लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत.
साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिअन पब्लिशर्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांना लाभले आहेत.
अनिल मेहता यांचे चिरंजीव सुनिल मेहता यांचे जानेवारी २०२२ मध्ये निधन झाले.