मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. रंगनाथ पठारे यांचा जन्म २० जुलै १९५० रोजी मु.पो.जवळे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे झाला.
प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले.
‘ताम्रपट’ या त्यांच्या श्रेष्ठ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘भर चौकातील अरण्यरुदन,’ ‘दु:खाचे श्वापद,’ ‘टोकदार सावलीचे वर्तमान ‘ २००६मध्ये आलेली ‘कुंठेचा लोलक’ अशा कादंबऱ्यांमधून त्यांनी वास्तववादी साहित्याला आकार दिला. शैली आणि अभिव्यक्तीचे प्रयोग त्यांनी जसे कादंबरीमध्ये केले, तसेच कथांमध्ये. ‘अनुभव विकणे आहे,’ ‘शंखातला माणूस’ हे त्यांचे कथासंग्रह या प्रयोगशीलतेचीच साक्ष देतात. त्यांच्या लेखनात सामाजिक प्रेरणा अधिक दिसते. ‘ताम्रपट’ ही कादंबरी समाजातील विसंगती टिपत व्यामिश्रतेची उकल करण्यास प्रवृत्त करते.
२० वर्षे अभ्यास केल्यानंतर “सातपाटील कुलवृत्तांत” ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा वेध घेणारी त्यांची महाकादंबरी २०१९ मध्ये प्रकाशित झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना साहित्य अकादमीच्या केंद्रवर्ती समितीवर मराठी भाषेसाठी समन्वयक म्हणून रंगनाथ पठारे काम करत आहेत. या त्यांच्या लेखन कार्याची दखल सामाजिक, वाड्.मयीन व शासकीय स्तरावरही घेतली गेली. हिंदी, सिंधी, कोकणी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतून त्यांच्या लिखाणाचे अनुवाद केलेले आहेत.
‘ताम्रपट’ या बृहत कादंबरीला मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार देऊन त्यांच्या वाड्.मयीन कर्तृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. रंगनाथ पठारे यांचे लेखन असे विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने १९७० नंतरचे एक महत्त्वाचे लेखक म्हणून मराठी वाड्.मयाच्या इतिहासकाराला त्यांची नोंद घेणे अटळ ठरणार आहे, यात शंका नाही.