ज्येष्ठ लेखक बापू वाटवे यांचा जन्म १९२४ साली झाला.
मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते. बापू वाटवे यांचे मामा म्हणजे प्रभातचे एक संस्थापक विष्णुपंत दामले यांचे चिरंजीव अनंतराव होत. बापू वाटवे हे अशा वातावरणात लहानाचे मोठे झाले. प्रभातमध्ये त्यांनी सहदिग्दर्शनापासून पडेल ते काम केले. काही चित्रपटातून लहान मुलाच्या भूमिकाही केल्या.
चित्रपटविषयक दर्जेदार लेखन करण्यात त्यांचा हातखंडा असला तरी त्यांनी चित्रपटनिर्मितीच्या अनेक अंगांमध्येही लीलया संचार केला होता. ‘धाकटी सून’, ‘सतीची पुण्याई’ या चित्रपटांचे संवादलेखन, पटकथालेखन त्यांनी केले होते, तसेच ‘पहिली तारीख’, ‘गोकुळ’ आणि ‘घरचं झालं थोडं’ या चित्रपटाच्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी पेलल्या होत्या.
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते.
‘एक होती प्रभातनगरी’, दादासाहेब फाळके यांचे चरित्र आणि ‘दामले-फत्तेलाल : अ बायोग्राफी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयासाठी १९८४ मध्ये बापू वाटवे यांनी विष्णुपंत दामले यांचा मोनोग्राफ तयार करून दिला. प्रभातमुळेच त्यांची देव आनंदशी मैत्री झाली. ती अखेपर्यंत राहिली. पण या मैत्रीचा त्यांनी कधी उच्चार केला नाही की त्याचे भांडवल केले नाही.
बापू वाटवे यांचे निधन ४ मार्च २००९ रोजी झाले.