सरकारी माणूस आणि त्यांची कार्यपद्धती हा देशभरात चेष्टेचा आणि कुचेष्टेचा विषय असतो. मात्र काही सरकारी कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कार्यपद्धतीने आणि सृजनशीलतेने लोकहितकारी योजना राबवतात आणि त्या प्रचंड यशस्वीही करून दाखवतात. १९७२ मध्ये मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले आणि सृजनशीलतेला नवे आयाम मिळाले.
नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले.
आकाशानंद यांच्या कामातील नेमकेपणा, सातत्य आणि उत्कृष्ट नियोजन याच्या जोरावर हा कार्यक्रम खूपच गाजला. राज्यात तब्बल १५० ज्ञानदीप मंडळे स्थापन झाली, एवढी या कार्यक्रमाची लोकप्रियता होती. सरकारी माध्यमाच्या चाकोरीत आणि चौकटीत राहून त्यांनी हे काम केले. ‘ज्ञानदीप’वर आधारित ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिकही त्यांनी २५ वर्षे चालवले. ‘ज्ञानदीप’वर पीएचडी झाली आणि ‘बीबीसी’ने ‘ज्ञानदीप’वर लघुपटही बनवला.
दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद यांचे १३ मार्च २०१४ रोजी निधन झाले.