आधुनिक कवी, लघुनिबंधकार कथाकार व पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म मुंबई येथे २ डिसेंबर १९०५ रोजी झाला.
चाकोरीबद्धतेला छेद देणारी विचारशैली, नाट्यात्मकता आणि मानवी संबंधांचे सखोल दर्शन घडविणारे व्यक्तिचित्रण, ही त्यांच्या साहित्याची काही ठळक वैशिष्ट्ये होती. प्रवासवर्णनाला साहित्यिक दर्जा देण्याचे श्रेयही काणेकर यांच्याकडेच जाते.
गिरगावातील चिकित्सक समूहाच्या शाळेत शिक्षण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून बीए आणि मग कायद्याची पदवी त्यांनी घेतली. चार वर्षे त्यांनी वकिली देखील केली. पण साहित्याकडे असलेला ओढा त्यांना स्वस्थ बसू देईना. १९३३ मध्ये चांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि पुढील वर्षी पिकली पाने या लघुनिबंध संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी वकिली पैशाला रामराम ठोकला आणि साहित्य सेवेत स्वतःला वाहून घेतले.
१९३५ ते १९३९ अशी चार वर्षे `चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक म्हणून ते कार्यरत होते. तोवर सिद्धहस्त साहित्यिक म्हणून त्यांचा दबदबा वाढत होता. `प्रभात’च्या `माणूस’ चित्रपटाचे संवाद लेखन आणि नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य या नात्याने त्यांचा कला प्रवासही अधिक व्यापक झाला. खालसा आणि सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी बरीच वर्षे अध्यापन केले.
तुटलेले तारे, उघड्या खिडक्या हे लघुनिबंध संग्रह, रुपेरी वाळू हा रूपककथांचा संग्रह, जागत्या छाया, मोरपिसे, दिव्यावरती अंधार, काळी मेहुणे हे कथासंग्रह, धुक्यातून लाल तार्याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर तांबडी माती प्रवास ही प्रवासवर्णने अशी साहित्यसेवा त्यांनी केली.
१९५७ मध्ये औरंगाबादला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पद्मश्री, सोवियत देशाचे नेहरू पारितोषिक आधी सन्मानही त्यांना लाभले.
२२ जानेवारी १९८० रोजी त्यांचे निधन झाले.
अनंत आत्माराम काणेकर यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
## Kanekar, Anant Atmaram
## Anant Atmaram Kanekar