(डॉ.) अरुणा ढेरे

Dr. Aruna Dhere

मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपं आपली वाढ हरवून बसतात, असं म्हणतात! पण केळीची जनरीतच वेगळी. तिच्या गाभ्यातूनच नवी केळ जन्मला येते, तिचंच रंगरूप घेऊन. अरुणा ढेरे यांचं अस्तित्व असं आहे. त्याही थेट आपल्या वडिलांचेच गुण घेऊन जन्माला आल्या आहेत. त्यांच्यातूनच उगवाव्यात तशा. त्यांचे वडील म्हणजे प्रख्यात लेखक- संशोधक रामचंद चिंतामणी ढेरे यांनी आयुष्यभर लोकसंस्कृतीचं उत्खनन केलं. कारण मानवाच्या प्रगतीचा-अधोगतीचा आलेख काढायचा, तर त्याचे सांस्कृतिक स्तर तपासण्याशिवाय गत्यंतर नसतं. या ध्यासातूनच त्यांनी महाराष्ट्रातील खंडोबा-विठोबा-भवानी-महालक्ष्मी यासारख्या विविध लोकदेवतांच्या आजच्या रूपाचा दैवतशास्त्राचा आधारे वेध घेतला आणि त्यांच्या उपासकांच्या कलांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचं संचित शोधलं. रा. चिं. यांच्या अखंड चाललेल्या संस्कृतीच्या या संशोधनयज्ञाच्या अरुणा ढेरे लहानपणापासूनच साक्षीदार होत्या. तेव्हा वडिलांच्या या ज्ञानमार्गाची ओढ त्यांना वाटली नसती तरच नवल होतं. किंबहुना वडिलांच्या या ज्ञानमागीर् तपस्येतूनच ही संस्कृतीची लेक जन्माला आली आणि वयाच्या अवघ्या दहाव्या-बाराव्या वषीर् अरुणा यांना अभिव्यक्तीचं माध्यम गवसलं. तो काळच कवितेच्या बहर आणि बहाराचा होता. साहजिकच अरुणा यांना इतर कुठल्याही साहित्यप्रकाराच्या आधी कवितेनेच साद घातली. कवितेच्या त्या दिवसांबद्दल त्या म्हणतात- ‘तेव्हा कवितेचं असं इंदजाल पसरलं होतं की आयुष्याचं दुसरं नाव तेव्हा कविता असतं, तरी चाललं असतं.’ कवितेचं ते गारुड त्यांच्या मनावरून आजही पुसलं गेलेलं नाही. किंबहुना त्यांनी केलेलं ‘कृष्णकिनारा’, ‘अज्ञात झऱ्यावर रात्री…’ यासारखं ललितलेखन असो वा त्यांचं ‘विस्मृतीचित्रे’, ‘सार्वजनिक सत्यधर्माचे उपासक डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’ यासारखं संशोधनपर लेखन असो; त्यांच्या प्रत्येक साहित्य-कृतीत कविताच भेटते आपल्याला गद्यरूपाने. कारण अनुभव कुठलाही असो, विषय कुठल्याही काळातला असो, त्या कवितेइतक्याच तरलतेने प्रत्येक अनुभवविषयाला भिडतात.म्हणूनच त्यांचं लेखन कवितेसारखं उभं असो वा गद्यासारखं आडवं, वाचकाच्या थेट अंत:हृदयात जाऊन पोचतं. हे सारं लेखन त्यांनी वडिलांच्या प्रातिभ ऋणात राहून केलेलं असलं, तरी त्याला स्वत:चा तोंडवळा आहे. त्यामुळेच त्यांचं एकूणएक लेखन वडिलांपेक्षा वेगळं आहे. रा. चिं. ढेरे शास्त्र-काट्याची कसोटी लावून संस्कृतीची छाननी करतात. परिणामी त्यांच्या लेखनाने दिपून जायला होतं. आपल्या सगळ्या जाणिवा संस्कृतीशी समरूप केल्याशिवाय या ज्ञानमार्गावरून सर्वसामान्यांना वाटचाल करताच येत नाही. याउलट अरुणा ढेरे यांचं लेखन आहे. त्यांच्या एकूणच लेखनाचे अंत:स्तर तपासले, तर त्याही एकप्रकारे आपल्याला आपल्या गतेतिहासाकडे, संस्कृतीकडेच घेऊन जातात. पण ही वाटचाल फुलांच्या पायघड्यांसारखी असते. चालून तर होतं, पण वाट कधी संपली तेच कळत नाही. वयाच्या वीस-बाविसाव्या वषीर् अरुणा ढेरे यांनी या वाटेवरून वाचकांना घेऊन जायला सुरुवात केली आणि अजून त्या नेतच आहेत. जणू त्यांच्या याच कार्याचा गौरव ‘अनंत लाभसेटवार’ पुरस्काराने झालेला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.