बाळ ज. पंडित

Baal J. Pandit
क्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक
जन्म दिनाक: २४ जुलै १९२९
मृत्यू दिनांक: १७ सप्टेंबर २०१५

क्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक बाळ ज. पंडित यांचा जन्म २४ जुलै १९२९ रोजी झाला.

जगभरात कोठेही चालू असलेला क्रिकेटचा सामना घरबसल्या एचडी टीव्हीवर पाहत क्रिकेटचे बारकावे टिपणाऱ्या आजच्या तरुण पिढीला रेडिओवरील धावत्या समालोचनाचे महत्त्व कदाचित कळणार नाही. मात्र, आज चाळिशीत किंवा त्याहून अधिक वयाच्या असलेल्या पिढीसमोर रेडिओ ऐकत असतानाचे चित्र नक्कीच समोर येईल. दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाइल आदी साधने नसतानाच्या काळात केवळ रेडिओवरूनच क्रिकेट सामन्यातील प्रत्येक क्षणाची स्थिती कळत असे. राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी आणि हिंदीतून आलटून-पालटून समालोचन केले जात असताना मराठीतून समालोचन करण्याचा मार्ग प्रशस्त केला तो बाळ पंडित यांनी.

अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत आणि रेडिओला कान लावून असलेल्या क्रिकेट रसिकाला जणू सामना पाहत असल्याचा आनंद मिळत असे.

पूना क्लबवरील क्रिकेटपासून मुंबईतील चौरंगी-पंचरंगी सामन्यांपर्यंतचा तपशील ते बारकाईने सांगत असत. पालवणकर बाळू (पी. बाळू) या उपेक्षित क्रिकेटपटूबद्दल त्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग देशातील क्रिकेटच्या इतिहासलेखनात झाल्याची आठवण ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मध्यंतरी दिली होती.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सहसचिव आदी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. या संघटनेला नावारूपास आणण्यात आणि पुणे शहरास आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संयोजन शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.बाळ ज. पंडित यांचे वाणी आणि लेखणी या दोहोंवर प्रभुत्व होते.

बाळ ज. पंडित यांचे निधन १७ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.