दत्तात्रेय कोंडो घाटे

कवी दत्त
Dattatray Kondo Ghate

जन्म दिनाक: २७ जून १८७५
मृत्यू दिनांक: १३ मार्च १८९९

कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा!

महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.

यशवंतांनी म्हटले होते : ‘एज डजंट मॅटर. नो. यू आर नॉट टू यंग; पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ‘ पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.

हे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, ‘दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ‘ असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.
कवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता.
कवी दत्त म्हटले की आठवते ती ‘बा नीज गडे’ ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.

कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत. मा.दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.

दत्त यांची कविता
…………………………………
निज नीज माझ्या बाळा (ही रचना १८९७ मधील आहे.)
…………………………………
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा

रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।ध्रृ।।
खडबड हे उंदिर करिती ।
कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती ।
लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। ध्रृ ।।
बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा ।
सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा ।
हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? ।
आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? ।
त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला ।
धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा ।
मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त (27-Jun-2017)

#Datta #DattatrayKondoGhate




Listing
b - २७ जून १८७५
d - १३ मार्च १८९९
LS - Dead