दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव.
तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे.
लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ‘ पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
जरा जाऊन येतो, काय रानटी लोक आहेत, वणवा आदी ११ कथासंग्रह, ‘देव चालले’ आणि ‘आनंदओवरी’ या कादंबर्या आणि ‘पालखी’ व ‘अठरा लक्ष पावलं’ ही प्रवासस्पंदने त्यांनी लिहिली. ‘गुपित अंधारदरीचे’ ही किशोरकथाही त्यांचीच.
कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.