ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी तळेगाव दाभाड्याजवळील निगडे या गावी झाला.
ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.
‘जनाबाई: जीवन, साधना आणि कविता’ आणि ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या दोन पुस्तिकांचे लेखन याच दरम्यानचे. सन १९५५पासून त्यांचे संशोधन आणि लेखन सातत्याने चालूच होते. १९६६ मध्ये ते पुणे विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले, तर १९७५ मध्ये पी.एच.डी प्राप्त केली. १९८० मध्ये त्यांना पुणे विद्यापीठाची डी. लिट. मिळाली.
दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले.