हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
आजवर १८ ग्रंथांचे लेखन, संतवाड्म़याचा अभ्यास, संत चरित्रावर व्याख्याने, आकाशवाणीवर – दूरदर्शनवर कार्यक्रम अणि भारतासह जगभराचा प्रवास करणार्या शुभाताईंनी लेखन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील ७५ कर्तृत्ववान महिलांची छोटी चरित्र स्वरुपात मांडणी असणारे त्यांचे “यशस्विनी” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या जोडीलाच “यशवंत” हे ठाण्यातील ६१ कर्तबगार पुरुषांची माहिती सांगणारे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.
मनातील ठाणे :
ठाण्याबद्दल बोलताना त्या म्हणतात की, कालचं ठाणे आकारानं, लोकसंख्येनं छोट होतं. वृक्षवल्लींनी सुशोभित होतं. बरेचसे नागरिक परस्परांना ओळखत होते. महाविद्यालयीन शिक्षणार्थ विद्यार्थ्यांना मुंबईस जावे लागे. आज ठाणं विकसित झालं आहे. उद्याचं ठाणे हे सर्वसामान्यांना प्राथमिक गरजा, सुविधा पुरवेल. तसंच ज्येष्ठ, अपंग, स्त्रिया व मुलं यांना सुसह्य आणि आनंदी जीवन देणारे असेल असं त्या ठाण्याबद्दल सांगतात.
पुरस्कार : त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ठाणे गौरव, ठाणे नगररत्न, जीवन गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.