जन्म- २ ऑक्टोबर १९०८
मृत्यू- १ डिसेंबर, १९८८
गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते. गं बा सरदार या नावानेच ते परिचित होते.
त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार या गावी झाला. त्यांचे शिक्षण जव्हार, मुंबई व पुणे येथे झाले.
१९३० सालच्या मिठाच्या सत्यागहात सहभागी होऊन त्यांनी तुरूंगवासही भोगला. मात्र देशातील बदलत्या परिस्थितीत ते साम्यवादी तत्त्वज्ञानाकडे ओढले गेले. सकिय राजकारणापासून दूर राहून त्यांनी वैचारिक पातळीवरून लेखन-भाषणांद्वारा सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात स्वत:ला गुंतवून घेतले.
१९४१ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविदयालयात मराठीचे व्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली. ते काही काळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. तेथूनच १९६८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
१९८० साली बार्शीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
सरदारांनी लिहिलेल्या ग्रंथांत महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९४१), न्या. रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७३), आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५), महात्मा फुले : विचार आणि कार्य (१९८१) या काही ग्रंथांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८), नव्या युगाची स्पंदने (१९८४), नव्या उर्मी, नवी क्षितिजे (१९८७), परंपरा आणि परिवर्तन (१९८८) हे त्यांचे स्फुट लेखांचे संपादित संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत.