सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.
इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२ पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.
श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्रय निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)