भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते. त्यांच्या हाताखालीच त्यांचे संस्कृतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुण्यातील केशवशास्त्री नेने यांच्याकडे ते व्याकरण व न्यायशास्त्र शिकले. शिष्यवृत्ती मिळवून ट्रेनिंग कॉलेजमधील शिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केला. काही काळ ठाणे आणि अहमदनगर मध्ये नोकरी केल्यानंतर मुंबईतील एलफिस्टन हायस्कूलमध्ये ते बराच काळ शिक्षक होते. १९०१ मध्ये ते निवृत्त झाले. संस्कृतचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून ते लोकप्रिय होते. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध विषयांवर बरेच लेखन केले. ‘नौका नयनाचा इतिहास’ हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. त्यानंतर ‘नेपोलियन बोनापार्ट यांचे चरित्र’, ‘पाल आणि व्हर्जिनिया,’ ‘हरि आणि त्र्यंबक’, ‘इलिझाबेथ अथवा सिबिरिया देशातील हद्दपार झालेले कुटुंब,’ ‘दाशरथी रामचरित्रामृत’ हे ग्रंथ तर त्यांच्या नावावर आहेतच. या व्यतिरिक्त संस्कृत ग्रंथार्थ संग्रह या नावाखाली २५ ते ३० कथापुराणांचे पुस्तक त्यांनी लिहिले. विद्यार्थ्यांसाठी काही संस्कृत भाषेची पुस्तके त्यांनी लिहिली. ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. त्याच्या एकंदर नऊ
आवृत्त्या निघाल्या. हा ग्रंथ त्यांनी ‘सिद्धांतकौमुदी’, ‘अमरकोश’, ‘वररूची प्रकाश’ इत्यादींच्या मदतीने तयार केला होता. यात काही ठिकाणी व्युत्पत्ति देतांना तत्कालीन सामाजिक, धार्मिक, संकेतांचे वर्णन केले आहे. भाषेचे फेरफार तसेच लोकांच्या आचार, विचारातील कालानुरूप घडणारा बदलही समजतो. हे त्यांच्या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय. महाराष्ट्रातल्या ह्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचे ६ मार्च १९०५ रोजी निधन झाले.