म.द. हातकणंगलेकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे झाला. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगलेत झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मामाकडे सांगलीत आले आणि सांगलीकर होऊन गेले.
१९५० मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले. त्यानंतर हातकणंगलेकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीमधील विलिंग्डन महाविद्यालयात अर्धव्याख्याता म्हणून अध्यापन कारकिर्दीला सुरवात केली. पुढे धारवाड येथे महाविद्यालयात ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. १९५६ साली ते विलिंग्डन मध्ये परतले आणि तिथेच ते प्राध्यापकापासून ते प्राचार्य असे सलग १९८७ सालापर्यंत काम करीत राहिले.
’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले.
आपल्याला आलेल्या अनेक अनुभवावरून ’उघडझाप हे आत्मवृत्त वाचकांच्यासमोर आणले.. त्याचे प्रकाशन त्यांचे साहित्यिक मित्र आणि प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते.
म,द, हातकणंगलेकरांनी साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळावरही अनेक वर्ष काम केले होते. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना प्रेरणा देण्याचे आणि त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचा जो प्रयत्ना केला त्यातून अनेक नवे साहित्यिक तयार झाले. त्यांनी आजचे मराठीतील आघाडीचे लेखक विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे यांच्यापासून सांगली परिसरातील नामदेव माळी, दिलीप शिंदे, दयासागर बन्ने, चैतन्य माने अशा अनेक नवोदित लेखकांना लिहिते केले, त्यांना प्रकाशक शोधून दिले.
सांगली येथील ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते. म.द. हातकणंगलेकर २५ जानेवारी, २०१५ रोजी निधन झाले.