मराठीतील व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६८ रोजी मालगुंड येथे झाला.
मोरो केशव दामले यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रावसाहेब मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते.
प्रसिद्ध कवी केशवसुत व पत्रकार सीताराम केशव हे मोरो केशवांचे अनुक्रमे थोरले व धाकटे बंधू. मधले बंधू मोरो केशव दामले हे मराठीतील नामवंत व्याकरणकार म्हणून प्रसिद्धी पावले.
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले. तसेच या ग्रंथात मोरो केशव दामले त्यांनी व्याकरणविषयक प्रश्नांची इतर अंगेही समोर आणली आहेत.
मोरो केशव दामले यांचे शालेय शिक्षण दाभोळ, बडोदे व अमरावती येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. १८९२ मध्ये बी.ए., व १८९४ मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन मोरो केशव दामले हे मुंबई विश्वविद्यालयाचे एम.ए. झाले.
मोरो केशव दामले यांनी १९०४ मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत भाग घेतला होता आणि त्यासंबधीची सडेतोड मते त्यांनी ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली होती. “व्याकरणकार मोरो केशव दामले‘ हे त्यांचं चरित्र लिहिणारे कृ. श्री. अर्जुनवाडकर त्यांचं वर्णन करतात,
“”साडेपाच फूट उंचीची सशक्त, थोराड देहयष्टी. सदाचरणानं तेजस्वी दिसणारी गौरवर्ण रुबाबदार मुद्रा, भरघोस मिशा, रुंद कपाळ, त्यावर उभे टळटळीत गंध, डोक्यारवर पुणेरी पगडी, अंगात शर्ट, त्यावर पारशी पद्धतीचा बंद गळ्याचा कोट, त्यावर उपरणं, खाली टिळक पद्धतीनं नेसलेलं पांढरं शुभ्र धोतर, पायात मोजे आणि बंदांचे लॉंग बूट अशी त्यांची रुबाबदार मूर्ती संबंधितांच्या मनात आदरयुक्त भीती उत्पन्न करीत असे.
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ (उद्घाटन व ऊहापोह) हा त्यांचा ग्रंथ दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी १९११ मध्ये प्रकाशित केला आहे. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांनी १९७० मध्ये या ग्रंथाचं साक्षेपी संपादन केलं असून, देशमुख आणि कंपनी, पुणे यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथानं केवळ मराठी व्याकरणाच्या क्षेत्रावरच नव्हे, तर हिंदी व्याकरणावरही प्रभाव पाडला आहे. हिंदी व्याकरणकार पं. कामताप्रसाद गुरू यांनी त्यांचा आदरानं उल्लेख केला आहे.
मोरो केशव दामले यांचे निधन ३० एप्रिल १९१३ रोजी झाले.