बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली. त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत.
साप्ताहिकांसाठी बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून नाटक कंपनी काढण्याचा विचार पक्का केला आणि ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली.
आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एके काळी, मोहर इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘सीमोल्लंघन’ आणि ‘कलंकशोभा’ या कादंबऱ्याही लिहिल्या.
मोतीराम गजानन रांगणेकर हे मराठी नाटककार, पत्रकार होते. त्यांना १९८२ सालाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९६८ साली ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते.
मो. ग. रांगणेकर यांचे १ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.