नारायण गजानन आठवले

Narayan Gajanan Athavale


प्रभावी लेखनानं सामाजिक, राजकीय वर्तुळात होणार्‍या भ्रष्टाचारा विरोधात कायमच आवाज उठवणार्‍या तडफदार, धाडसी पत्रकारांपैकी एक अशी नारायण आठवलेंची ओळख, महाराष्ट्राला नवी नाही.

“लोकमित्र” या वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या आठवलेंनी “आणीबाणीच्या” प्रसंगामध्ये इंदिरा गांधी विरोधात अगदी परखडपणे टिका केली. वृत्तपत्रीय लिखाण ही वाचनीय असते, याचा प्रत्यय आठवलेंनी आणून दिला.“लोकसत्ता” व “सोबत” मधून चालवलेली सदरं खूपच लोकप्रिय ठरली होती.

पत्रकारितेसोबतच २५ कथा, कादंबर्‍यांतून त्यांनी लिलित लेखन केलं. “प्रीत पतंगाची खरी” या त्यांच्या कादंबरीवर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता. १० वर्षे “गोमांतक” वृत्तपत्राचे संपादक भुषवताना त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा स्वत:ला झोकून दिले होते, त्याचबरोबर गोव्यात मराठी, कोकणी बरोबरच राज्यभाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी त्यांनी प्रसंगी तुरुंगवास ही भोगला. “संयुक्त महाराष्ट्र आंदोलन” व “गोवा मुक्ती संग्राम” यात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. आठवलेंनी गोव्यात अपंग मुलांसाठी “लोकविश्वास” ही संस्था सुरु केली.

कटु शिवसैनिक असणार्‍या नारायण आठवलेंनी १९९६ मध्ये उत्तर-मध्य मुंबई भागातून प्रतिनिधीत्व केले. १८ महिने खासदार असलेल्या आठवलेंनी पुढील निवडणूकीत पराभूत झाल्यावर राजकारणाकडे साधं ढूंकून ही पाहिलं नाही किंवा माजी खासदार म्हणून मिळणार्‍या, सरकारकडून कोणत्याच सोयी-सुविधांची अपेक्षा सुद्धा बाळगली नाही. पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक म्हणून नारायण आठवले कायमच महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील ते त्यांच्या लढवय्या वृत्तीमुळे आणि आपल्या तत्त्व व विचारांवर निष्ठा असणार्‍या संवेदनशील माणसावर.