जनकवी पी सावळाराम यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला. पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तेव्हा त्या कॉलेजात माधव ज्यूलिअन शिकवत असत. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती. सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले.
तब्बल ५० वर्षे मराठी ह्रदयाच्या मनाला भावगीताचे वेड लावणारे भावगीतकार पी. सावळाराम यांचे निधन २१ डिसेंबर १९९७ रोजी झाले.