मराठी गझलकार प्रदीप निफाडकर यांचा जन्म २ जुलै १९६१ रोजी झाला. ‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर.
प्रदीप निफाडकर यांनी प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेत वात्सल्यता व आध्यात्मिकता आणली. ते पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे.
प्रदीप निफाडकर यांनी २४ तीर्थंकरावर गाणी लिहिली होती. ती सर्व गीते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. त्या गीतांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. ‘गझलसम्राट सुरेश भट आणि…’ हे गुरूवर्य सुरेश भट यांचे चरित्रात्मक आठवणींचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
भारतातील सर्व भाषा तसेच नेपाळी, इंग्रजी भाषेतील ‘आई’ या विषयावरील कवितांचे संपादन श्री. निफाडकर यांनी केले, त्याचे ‘माँ’ नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे.
‘मी मराठी’ या वाहिनीच्या ‘सलाम नाशिक, सलाम नागपूर व सलाम कोल्हापूर’ या कार्यक्रमांचे शीर्षक गीतलेखन निफाडकर यांचेच होते.
प्रदीप निफाडकर यांना आतापर्यंत राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार, कै. भाऊसाहेब पाटणकर स्मृती, उर्दूमित्र, वैष्णवमित्र, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर समाजनिष्ठ पत्रकारिता, रामसुखजी भट्टड पुरस्कृत कै. दादासाहेब पोतनीस आणि दै. देशदूततर्फे ‘गुणवंत’, साहिर लुधियानवी व बलराज सहानी फाउंड़ेशनचा ‘जाँ निसार अख्तर पुरस्कार’ असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
अमरावती येथे १९८९ ला झालेल्या संमेलनापासून अखिल भारतीय संमेलनात त्यांचा सातत्याने निमंत्रित कवी म्हणून सहभाग आहे. दुबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पुण्याहून फक्त त्यांनाच निमंत्रित केले होते. मुक्ताईनगर येथील अखिल भारतीय उर्दू मुशायर्यालत अध्यक्ष म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली आहे.
उर्दू साहित्य परिषदेचे ते बिनविरोध निवडून आलेले पहिलेच मराठी भाषक अध्यक्ष होते.