प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

Nagnath Kotapalle
जन्म दिनाक: २९ मार्च १९४८

कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली.

प्रारंभी बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात त्यांनी अध्यापन केले. नंतर १९९६ पर्यंत मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे ते प्राध्यापक होते. १९९६ नंतर पुणे विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९७० पासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. ‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’ या कादंबर्‍या आणि इतरही बरेच ललित साहित्य प्रसिद्ध आहे. ‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘आधुनिक मराठी कविता, ’ ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’ इत्यादी विषयांवर केलेले समीक्षा लेखनही ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे. ‘निवडक बी. रघुनाथ’ आणि ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथांचे संपादनही नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले आहे. या व्यतिरिक्त अनेक विषयांवरील त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत.

नागनाथ कोत्तापल्ले हे एक चांगले वक्ते म्हणून ही महाराष्ट्राला परिचयाचे आहेत.

## Nagnath Kotapalle