रा.जे देशमुख

R. J. Deshmukh


स्वयंभू प्रकाशन संस्थेचे रा.जे. देशमुख हे संस्थापक आहेत. त्यांची प्रकाशन पध्दत ही त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच अनोखी अशी आहे. वि.स.खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांची आपल्या पुण्यातल्या गढावर राहण्याची व्यवस्था करून, खांडेकरांकडून “ययाती”, आणि रणजित देसाईंकडून, “स्वामी” व “श्रीमान योगी” यांसारख्या दर्जेदार कादंबर्‍या त्यांनी लिहून घेतल्या. त्यासाठी त्यांची प्रचंड सरबराई केली व बडदास्त देखील राखली. तसंच या कादंबर्‍यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली. त्यांच्या मोठमोठया आवृत्त्या काढून व वितरणासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून, त्या अल्प किंमतीत वाचकांना उपलब्ध करून दिल्या. रणजित देसाईंच्या स्वामी या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या कादंबरीचे त्याकाळी तीन रूपये इतकी किंमत होती.

राजे देशमुखांचे हे अभूतपूर्व उपक्रम काही काळच सुरू राहिले. त्यांचे प्रकाशन संस्थेचे बोधचिन्ह कासव होते. आता त्यांच्या प्रकाशन कार्याचा आवेग व अवाका फार नसला तरी, त्यांचे साहित्य व प्रकाशन क्षेत्रातील योगदान अतुलनीयच म्हणावे लागेल.