राजन खान

Rajan Khan
मराठी कथालेखक आणि कादंबरीकार


राजन खान हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. ते अक्षर मानव चळवळीचे प्रमुख आहेत.

१९७० च्या दशकापासून ते अव्याहतपणे मराठीत लेखन करत आहेत. मानवी भावभावनांमधील बारकावे खोलवरपणे टिपणे, हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. करुणा, माणुसकी व सामाजिक भान ही राजन खान यांच्या लेखनाची महत्त्वाची बलस्थानं आहेत. धर्म, जात, लिंग, वर्ग या पलिकडे जाणारी मानवतावादी मूल्यं आणि त्यांचं उदात्तीकरण हे त्यांच्या लेखनामागचं प्रयोजन ठळकपणे समोर येतं. आपल्या साहित्यातून त्यांनी वाचकांच्या जाणीवा व अनुभवविश्व समृद्ध केलं आहे.

सतरा कथासंग्रह, सोळा कादंबर्‍या, तीन ललित / वैचारिक लेखसंग्रह, आपल्या कथांमागच्या कथा सांगणारे दोन लेखसंग्रह इतकं संग्रहित आणि बरंचसं ललित आणि सदर लेखन असंग्रहित- असं मुबलक लेखन केलेल्या राजन खान यांना सर्वार्थानं बहुप्रसवा लेखक म्हणता येईल. गेल्या तीनेक दशकांत सातत्यानं साहित्यविश्वा त त्यांचं लेखन कुठे ना कुठे येत राहिलं आहे. अनेक वर्षं अनेक दिवाळी अंकांचे हुकमी आणि हातखंडा लेखक म्हणूनही राजन खान यांचं नाव प्रसिद्ध आहे.

राजन खान यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार “धुडगूस” या चित्रपटासाठी २००९ मध्ये दिला गेला. मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे त्यांना “समाजप्रबोधन पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूरच्या भरूरतन दमाणी साहित्य पुरस्काराने २०१३ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राजन खान यांच्या ‘जमीन’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

राजन खान हे २००३ साली सावंतवाडी येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. २००८ साली मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक त्यांनी प्रा. हातकणंगलेकर यांच्या विरोधात लढवली होती.

राजन खान यांनी २००९ साली “मी संमेलन” नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते. राजन खान यांच्यावर प्रा. डॉ. शाम गायकवाड यांनी ‘कथाकार राजन खान’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

राजन खान यांचे प्रकाशित साहित्य

अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
आडवं आणि तिडवं (कथासंग्रह)
आणखी एक पंचवटी (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी कादंबरी – कुसुम अन्सल)
इह (माहितीपर)
एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
एदेनाच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
कथा आणि कथेमागची कथा भाग – १
कथा आणि कथेमागची कथा भाग – २
कसक
काळ (कादंबरी)
किंबहुना (ललित)
गाठी गाठी जीव (कादंबरी)
गूढ (कथा संग्रह)
ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)
जन्मजंजाळ (कथा संग्रह)
जमीन (कादंबरी)
जातवान आणि विनशन (कादंबरी)
जिनगानी (ललित)
जिरायत (ललित)
तंतोतंत (लेख संग्रह)
तत्रैव (कथा संग्रह)
देश (वैचारिक लेखसंग्रह)
पांढऱ्या जगातला अंधार
पिढी (वैचारिक)
फैल आणि रात्र (कथा संग्रह)
बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
बाई जात (कथा संग्रह)
बाहेरनाती (कथासंग्रह)
बीजधारणा (कादंबरी)
मनसुबा
मानसमंत्रणा (वैचारिक लेखसंग्रह)
मीच मला माहिती नाही (कादंबरी)
यतीम (कादंबरी)
रजे हो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा (कादंबरी)
रसअनौरस (कादंबरी)
वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
संगत विसंगत (वैचारिक लेख संग्रह)
सत्‌ ना गत (कादंबरी)
सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
हयात आणि मजार (कादंबरी)
हिलाल (कादंबरी)

राजन खान यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

http://uniquefeatures.in/e-sammelan-13/राजन-खान

## Rajan Khan