प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री.
रमेश मंत्री यांचा जन्म 6 जानेवारी 1925 रोजी कोकणातील कुह्राड जवळच्या झाराप या गावी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटूंबातले. त्यांचे मुळ नाव रमेश शंकर कुळकर. परंतु मंत्री घराण्यात दत्तक गेल्यामुळे रमेश राजाराम मंत्री असे त्यांचे नामांतर झाले. त्यांचे संपूर्ण शिक्षण कोल्हापूर येथे झाले. एम. ए. चा अभ्यासक्रम सुरु असतानाच स्थानिक, वृत्तपत्रांतून ते लिखाण करु लागले. त्यानंतर `पुढारी` या दैनिकात त्यांनी सहसंपादक म्हणून काही दिवस काम केले.
वृत्तपत्रव्यवसायाचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. 1958 ते 78 या काळात ते अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे साहजिकच जगभर त्यांनी भरपूर प्रवास केला. या प्रवासातून विविध प्रकारचे अनुभव घेत घेत लेखनासाठी आवश्यक असलेली एक समृध्द पार्श्वभूमी त्यांच्याजवळ निर्माण झाली. आणि त्यातूनच मुळातच प्रतिभासंपन्न साहित्य निर्मिती केली.
रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. `थंडीचे दिवस` सुखाचे दिवस, `नवरंग` इत्यादी त्यांची प्रवासवर्णन अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरली आणि वाचकांच्या पसंतीत उतरली. त्यांनी प्रचंड लेखन केले. 1979 हया एकाच वर्षात त्यांची 34 पुस्तके प्रकाशित झाली. इतक्या संख्येने पुस्तके प्रकाशित होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रवासवर्णन जशी मंत्री यांनी लिहिली तसेच साहित्याचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. त्यापैकी करमणूकप्रधान असे विनोदी लेखन त्यांनी बरेच केले.
1991 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मानाचे असे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
लेखनाच्या विक्रमाची नोंद असलेल्या या साहित्यिकाचे 19 जून 1998 रोजी निधन झाले.
## Ramesh Rajaram Mantri