संजय भागवत

Sanjay Bhagwat

जन्म दिनाक: १९ ऑक्टोबर १९५८
मृत्यू दिनांक: ३ फेब्रुवारी २०१९ 

मौज’ प्रकाशनाचे प्रकाशक संजय भागवत यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला.  सी. ए. म्हणून शिक्षण पूर्ण होताच त्यांनी ‘मौज प्रकाशन गृहा‘च्या व्यवसायात सहभागी होऊन वडील विष्णुपंत भागवत व काका श्री. पु. भागवत यांना हातभार लावण्यास सुरुवात केली.

‘मौज’चे संपादक-प्रकाशक म्हणून श्री. पु. भागवत यांनी १९९७ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर, संजय यांनी या संस्थेचे ‘प्रकाशक’ म्हणून पूर्ण जबाबदारी हाती घेतली. साहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी त्यांना श्री. पु. भागवत पुरस्काराने गौरवलेही होते.

सकस, दर्जेदार साहित्य प्रकाशनाची श्री. पुं.नी घालून दिलेली परंपरा संजय यांनीही कायम राखली. संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक नव्या लेखकांना संस्थेशी जोडून घेतले. मात्र, साहित्य प्रकाशनाची तीव्र स्पर्धा असतानाही, कोणतेही साहित्य प्रकाशित करण्याऐवजी केवळ निवडक व दर्जेदार साहित्य प्रसिद्ध करण्याचे श्री.पुं.चे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले.

उत्तम वाचन व साहित्याची चांगली जाण असलेले संजय मितभाषी, विनम्र स्वभाव व उत्तम निर्णयक्षमता या स्वभाववैशिष्ट्यांसाठी ओळखले जात.

दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, मुलगा अनिरुद्ध व मुलगी मनवा असा परिवार आहे. २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यापासूनच ते आजारी होते.




Listing
b - १९ ऑक्टोबर १९५८
d - ३ फेब्रुवारी २०१९ 
LS - Dead