शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.
शिवाजी सावंत यांच्या `मृत्युंजय` कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने हुलकावणी दिलेली असली, तरी लोकपीठाने ही कांदबरी चांगलीच उचलून धरली. भारतीय ज्ञानपीठ संस्थेचाच `मूर्तीदेवी` पुरस्कार या कादंबरीला मिळाला वाड्गमयाद्वारा भारतीय जीवनमुल्याचे चित्रण करणारा लेखक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो, अजुन तरी एकमेव मराठी लेखकाला मिळालेला हा पुरस्कार आहे.
सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 ला आजर्याच्या लाल मातीत झाला. कोल्हापुरच्या राजाराम हायस्कुलमध्ये त्यांनी वीस वर्ष अध्यापन केले. पुढे लोकशिक्षण मासिकाचे संपादन काही काळ केले. सावंत ह्यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी `मृत्यूजंय` लिहिली. कर्णाच्या या कथेने मराठी घरातल्या तीन-तीन पिढंयाना वेड लावले. ज्ञानपीठ संस्थेने त्यांचा हिंदी अनुवाद प्रसिध्द केला. त्याला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. गुजराती अनुवादाला गुजरात सरकारचे पारितोषिक मिळाले.
त्यांच्या `छावा`, `लढत`, `युगंधर` या कादंबर्यांनाही वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. मृत्युंजय प्रमाणेच कृष्णाच्या जीवनावरील `युगंधर` ही विविध भाषांत अनुवादिली गेली. कन्नड, मल्याळम, बंगाली, राजस्थानी, गुजराती व हिंदी या भारतीय भाषांमध्ये रूपांतरीत झालेल्या या कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वत्र पोहचले. या खेरीज इंग्रजीमध्येही ती पोहचली. `छावा` ही संभाजी राजांचे जीवन रेखाटणारी कादंबरी, श्रीकृष्णाच्या चारीत्रावर आधारीत `युगंधर` ही कांदबरी तसेच `मोरावळा` , `असे मन असे नमुने` ही व्यक्तिचरीत्रे लिहली. त्यांच्या कसदार लेखनाला भारतीय ज्ञानपीठाचा `मुर्तिदेवी` पुरस्कार मिळाला. गुजराथी रूपातंराला `साहित्य अकादमी पुरस्कार`, बडोदे साहित्य संमेल्लन व कामगार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद.
कऱ्हाड येथे भरणाऱ्या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.