एक साहित्यप्रेमी कवी म्हणून सोपानदेव नथूजी चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 साली जळगाव येथे झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आई बहिणाबाईं चौधरी यांना अक्षर ओळख नव्हती त्यामुळे शेतात काम करुन त्यांनी घर संसार चालवला. त्यातही कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची, येणार्या आपत्तींना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे त्यांचे म्हणावे तसे शिक्षण झाले नाही. परंतु योगायोगाने विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आणि सोपानदेवाची एकदा भेट झाली. भेटीचं रुपांतर स्नेहात झालं आणि त्यातूनच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयात सोपानदेव संगीताचे अध्ययन करु लागले. संगीताची आवड, मातोश्रींचा काव्य लेखनाचा वारसा या स्फूर्तीतून सोपानदेव 1920 च्या सुमारास काव्य रचना करु लागले. प्रतापी प्रतापसिंह आणि पुण्यश्लोक महात्मा हा महात्मा गांधींच्या जीवनावरील पोवाडा हे काव्यलेखन त्यांनी सुरुवातीच्या काळात केले. त्याच काळात नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 1932 `काव्यकेतकी` हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
त्यानंतर 1949 मध्ये अनुपमा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोपान देवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या एक प्रसिध्द कवयित्री होत्या. अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाई काम करता करता काव्यरचना करीत. जेव्हा शक्य असेल त्यावेळेस सोपानदेव त्या म्हणत असलेल्या कविता लिहून ठेवत असत. बहिणाबाईंच्या नंतर `बहिणाबाईंची गाणी` या नावाने सोपानदेवांनी त्या पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांचे हे काव्य अतिशय गाजले. सोपानदेवांनी साहित्यातील विविध विषय हाताळले. त्यांनी नवकाव्याची विडंबने लिहिली. महाराष्ट्र संबंधीच्या प्रासंगिक रचना त्यांनी केल्या. खान्देशी भाषेतून `जानपद` गीतेही लिहिली. या शिवाय सोपानदेवांचे कोटिबाज विनोदी काव्यसुध्दा प्रसिध्द आहे. 1962 साली त्यांच्या समग्र कवितांचे संकलन असलेला सोपानदेव हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.