मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म २५ मे १८९५ रोजी कशेळी येथे झाला.
त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्धीमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात.
मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या या अपूर्ण शिवचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे २८ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.