वसंत वैद्य यांचा जन्म महाड येथे ५ जानेवारी १९१२ रोजी झाला. ठाणे नगरपालिकेत ते मोठ्या पदावर नोकरीला होते. आपल्या व्यवसायापेक्षा ते प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.
“बहर” हा त्यांचा पदार्पणातील काव्यसंग्रहाने अल्पावधीतच खुप प्रशंसा व दुवा त्यांच्या पदरात पाडली होती. १९३८ साली प्रकाशित झालेल्या “विनोदिनी” या विडंबन गीतांच्या सुंदर संग्रहाला रसिकांनी भरभरुन दाद दिली होती. हास्याच्या कल्लोळातही विविध सामाजिक समस्यांना तोंड कसे फोडायचे आणि वाचकांना अंतर्मुख कसे करायचे या कौशल्याने “ओतप्रोत भरलेला”, हा विडंबन संग्रह त्यांच्या सामाजिक तळमळीची पुरेपूर साक्ष देतो.
त्यानंतर १९४० साली प्रकाशित झालेल्या “जीवनाकडे”, व “साद” या काव्यसंग्रहांनी त्यांना एक अष्टपैलु व बहुगुणी कवी अशी स्थिर ओळख मिळवून दिली. “पालवी”, “गलोल” हे दोन बालगीत संग्रह, तसेच “जिरेटोप” ही बालएकांकिका अशा कलाकृतींद्वारे लहान मुलांच्याही जीवनात त्यांनी हक्काचे व लाडके स्थान संपादित केले. “स्वप्न राहिले अभंग” हा नाटयप्रकार अत्यंत सफाईदारपणे हाताळून, “पेरणी” तसेच “छाया” या दोन हृदयस्पर्शी कथासंग्रहाचे जनक म्हणूनही ते सामान्य माणसांमध्ये परिचयाचे आहेत.