एखाद्या गावाची ओळख त्या गावाच्या ग्रामदेवतेवरून होते. तसेच एखाद्या व्यक्तिमत्त्वामुळे गावाचे श्रेष्ठत्व वाढते. नाशिकला लाभलेले असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज.
कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे जन्मनाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांच्या वडिलांचा वकिलीचा व्यवसाय होता. पुण्याहून हे कुटुंब आपल्या मूळगावी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे या गावी आले. वयाच्या पाचव्या – सहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी आपल्या चुलत घराण्यातील श्रीमती भागीरथीबाई वामन शिरवाडकर यांना दत्तक दिले. त्यामुळे गजानन रंगनाथ शिरवाडकर हे मूळ नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे नाव दत्तकविधानानंतर झाले.
वि. वा. शिरवाडकर यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण पिपळगावच्या लोकलबोर्ड शाळेत झाले आणि नंतर इंग्रजी पहिलीच्या शिक्षणासाठी ते नाशिकच्या सरकारी हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे हल्लीच्या रुंग्ठा विद्यालयात प्रवेश घेतला. वि. वा. शिरवाडकरांना त्यांच्या कुटुंबात ‘तात्या’ म्हणून संबोधले जायचे. पुढील आयुष्यात मग ते सर्वांचेच ‘तात्यासाहेब’ झाले.
तात्यासाहेबांना क्रिकेट व नाटक यांचे अतिशय वेड होते. शाळेत असतानाच त्यांच्या काव्य लेखनाला सुरुवात झाली होती. १९२९ साली देवदत्त नारायण टिळक यांच्या ‘बालबोधमेवा’ या मासिकात त्यांची कविता प्रसिद्ध झाली. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर १९३० साली नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ‘रत्नाकर’ मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहात तात्यासाहेबांचा सहभाग होता. १९३३ साली ‘ध्रुव’ मंडळाची स्थापना केली. ‘जीवनलहरी’ हा काव्यसंग्रह या मंडळाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला.
१९३४ साली बी. ए. झाल्यानंतर कुसुमाग्रजांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. गोदावरी सिनेटोनच्यावतीने ‘सती सुलोचना’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली आणि त्यात लक्ष्मणाची भूमिकाही केली. परंतु या व्यवसायात त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही. पुढे त्यांनी ‘स्वराज्य’, ‘सारथी’, ‘प्रभात’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ अशा वृत्तपत्रात १९३८ ते १९४६ या काळात काम केले. नंतर काही काळ ‘स्वदेश’ साप्ताहिकाचे काम केल्यानंतर त्यांनी आपले लक्ष लेखनावर केंद्रित केले. त्याकाळच्या दर्जेदार नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९४२ साली ‘विशाखा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
त्यानंतर ‘वैष्णव’ ही कादंबरी, ‘दूरचे दिवे’ हे नाटक ‘समीधा’, ‘किनारा’, ‘मराठी माती’, स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘छंदोमयी’, ‘मारवा’, ‘रसयात्रा’, आणि ‘प्रवासपक्षी’ हे त्यांचे कवितासंग्रह. ‘दुसरा पेशवा’, ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौंतेय’, ‘आमचं नाव बाबुराव’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’ इ.नाटकं तर ‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि १९८८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
चितनशीलता, राष्ट्रीयता, उत्कट कल्पनावैभव इ. तात्यासाहेबांच्या लेखनाची वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांच्या कवितेने मराठी मनावर राज्य केले. एक व्यक्ती म्हणूनही तात्यासाहेबांचे व्यक्तिमत्त्व अतिशय राजस आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे असे होते. अशा या कविश्रेष्ठाचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले.