प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक अशी ख्याती असलेल्या विनायक भावे यांचा जन्म ६ नोव्हेंबर १८७१ साली कोंकणातील पळस्पे या गावी झाला होता. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. विनायक भावे यांनी विल्सन विद्यापीठातून बी. एस्सी ची पदवी संपादन केली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली.
विनायक भावे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य महाराष्ट्र कवी नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. या मासिकाने अनेक मराठी काव्ये, बखरी, व इंग्रजी अमदानीच्या पुर्वी होऊन गेलेल्या कवींच्या कवीतांना पुन्हा उजाळा देऊन या सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची धडक मोहिम राबवली होती. हे एकीकडे सुरु असताना, दुसरीकडे त्यांचे वाचून झालेल्या ग्रंथसंपदेचे विवेचनात्मक व रसभरित विश्लेषण करणेही चालूच होते. त्यांनी इतिहास संशोधनाची नवी व प्रगल्भ दालने इतरांसमोर उघडली होती.
साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे. विनायक भावे यांनी आजवर अनेक जुने अप्रकाशित लेखक व कवींच्या, काव्य-लेखनसंपत्तीचे आभ्यासपुर्ण मंथन केले. आध्यात्मिक व वृत्तालंकारादी व्याकरणाच्या जंजाळात फसलेल्या कवितांपेक्षा, त्यांनी मुक्तेश्वरांच्या व शाहिरांच्या कवितांचे, रसग्रहण करण्यात अधिक धन्यता मानली. कारण या कवितांमध्ये भक्तीरसापेक्षा, त्या कवितेच्या आशयाला व भावनेला अधिक आपलेसे केले गेले होते. “महाराष्ट्र सारस्वत“ ही तर त्यांच्या काव्यप्रेमाने गाठलेली उत्कटतेची परिसीमा मानली जाते. ह्या कधीही विसरता न येणार्या दर्जेदार साहित्य विवेचकी वृत्तीने रसिकांसमोर उलगडुन दाखविले होते.
महाराष्ट्र सारस्वतची पहिली आवृत्ती ग्रंथमाला नावाच्या मासिकामध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात सतत भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसर्या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. “ग्रंथमाला“त पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे “चक्रवर्ती नेपोलियन“ हा देखील त्यांच्यामधील प्रतिभावंत व बोलक्या लेखकाचा, एक विनम्र प्रयत्न होता. भावे हे कोणताही ऐतिहासिक प्रसंग आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या बळावर जिवंत करण्यात तज्ञ होते, याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना वारंवार येतो.
१२ सप्टेंबर १९२६ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.