पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर

Pandit Vishnu Digambar Pulaskar

जन्म दिनाक: १९ ऑगस्ट १८७२

राष्ट्रीय पातळीवर संगीत प्रसाराचं अवघड काम यशस्वीपणे करण्याचं श्रेय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांना दिलं जातं. ते स्वतः द्रष्टे संगीतकार, थोर गायक आणि भाष्यकार होते. त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी मैफिली रंगवल्या, “रघुपती राघव राजाराम“ हे भजन स्वतः गाऊन त्यांनी लोकप्रिय केलं.

स्वतःची अशी स्वतंत्र संगीत लेखन पध्दती सुरु केली व सुमारे साठ संगीतविषयक ग्रंथ लिहून प्रकाशित केले. तसेच गांधर्व महाविद्यालय स्थापून पध्दतशीर अभ्यासक्रमाधारे संगीत शिकवून संगीतप्रसार करणार्‍या तज्ज्ञांची फळी उभी केली. स्त्रियांना संगीत शिकवण्याची स्वतंत्र व्यवस्था करुन दूरदृष्टी दाखवली. विष्णू दिगंबरांचा गायकीचा ठसा आणि संगीत प्रसाराचे प्रयत्न कधीही न पुसले जाणारे आहेत.

पंडित विष्णू दिगंबर गाडगीळ पलुस्कर यांचा जन्म कुरुंदवाड इथे १९ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. दिवाळीच्या दिवसांत फटाका चेहर्‍यासमोर अचानक फुटल्यामुळे लहान वयात डोळे अधू झाले. या अवस्थेतही विष्णू दिगंबर मात्र सतत कार्यमग्न राहिले. संगीताच्या क्षेत्रात परिवर्तन घडल्याशिवाय संगीत विद्येला व विद्यार्थि वर्गालाही चांगले दिवस येणार नाहीत याची विष्णू दिगंबर यांना खात्री झालेली होती. त्यामुळे संगीत आणि संगीतकाराला समाजजीवनात योग्य स्थान मिळावं या ध्येयपूर्ततेसाठी त्यांनी १८९६ साली मिरज हे गाव सोडलं व संपूर्ण भारत दौर्याला प्रारंभ केला.

५ मे, १९०१ रोजी त्यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यालयातून संगीत शिक्षण ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही संकल्पना त्या वेळी नव्हतीच. गुरुकुलात राहून विद्या शिकणं ही जी संगितविद्येची परंपरा होती, त्याला काहीसा छेद देऊन त्यांनी विद्यालयीन शिक्षणपध्दती सुरु केली. मात्र हे करत असताना त्यांनी गुरुशिष्यपरंपरेचा त्याग केलेला नव्हता. विद्यालयात दोन प्रकारचे विद्यार्थी होते. एक प्रकार असा की विद्यार्थी नियमित वेळेत येत व निघुन जात, तर दुसर्‍या प्रकारच्या विद्यार्थ्यीवर्गाला पंडितजी उपदेशवर्ग असं म्हणत. या उपदेशवर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा दिनक्रम निश्चित केलेला होता. हे शिष्यच उद्याचे संगीतकार आहेत, याची पूर्णत्वाने खात्री पंडितजींना होती.

लाहोरसारखं एका परप्रांतातील गाव त्यांनी शिक्षणशाळा सुरु करण्यासाठी निवडलं. जो प्रदेश पाहिलेला नाही, जिथल्या भाषेचा गंध नाही, संस्कार-रीतीभाती ठाऊक नाहीत, अशा अनोळखी गावी, अनोळखी प्रदेशात त्यांनी विद्यालय सुरु केलं. निव्वळ आत्मविश्वासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरलेलं संगीतामृतप्रवाह‘ हे मासिकही त्यांनी सुरु केलं.

लाहोरनंतर १९०८ साली पंडितजींनी विद्यालयासाठी मुंबईमध्ये एक भली मोठी इमारत बांधली. शिवाय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह काढलं. छापखाना काढला आणि ‘नारदी शिक्षा‘ ‘मांडूकी शिक्षा‘ असे ग्रंथ छापण्यास सुरुवात केली. वाद्यांची व्यवस्था नीट असावी या हेतूने वाद्यांचा स्वतःचा कारखाना काढला, त्यामुळे नवीन बनावटीची वाद्यंही तयार होऊ लागली. हा एवढा मोठा प्रपंच चालवण्यासाठी व त्यासाठी आर्थिक व्यवस्था स्वबळावर होण्यासाठी त्यांनी सामुदायिक जलसे सुरु केले. त्यामुळे अत्यल्प रसिकांना अभिजात संगीत ऐकायला मिळू लागलं.

एवढा मोठा संस्थापक प्रपंच चालवत असतांना त्यांनी स्वतःच्या गायकीकडे दुर्लक्ष केलं नाही. ते दूरदर्शी असल्यामुळे त्यांनि स्वतःच्या आवाजाचा अभ्यास स्वतःच केला. आपला आवाज मोठा आहे, मात्र तो तानक्रियेस म्हणावा तसा साहयभूत होणार नाही ही जाणीव झाल्याबरोबर त्यांनी मंद्रसाधनेला सुरुवात केली. विविध पलटे अशा पध्दतीने घोटले की तानक्रिया करते वेळी कोणताही त्रास होऊ नये आणि आवाजाला जडत्व राहू नये यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू होते. या कष्टाचं अर्थातच त्यांना फळ मिळालं. पंडितजींचा आवाज बुलंद होता, मात्र त्यात अत्यंत निर्मळ गोडवा होता. पूर्ण तीन सप्तकांत सहजतेने फिरणारा तो आवाज होता. सुरेलपणा हे त्या आवाजाचं प्रमुख वैशिष्टय होतं. लयतालाची पंडितजींची समज तर त्या काळी सर्वत्र गौरवलेली होती. गायन मांडणीसाठी त्यांनी काही सोपे उपाय सांगितले व त्या उपायांचा उपयोग शिष्यांकरवी प्रस्तुतीकरणात राबवला. त्यांनी सुरु केलेली ही पध्दतही संगीताला त्यांचं असलेलं योगदान म्हणता येईल.

पंडितजींच्या काही वैशिष्टयांचा उल्लेख करावयास हवा. कारण त्या वैशिष्टयांचे चांगले परिणाम आज संगीतावर झालेले पाहावयास मिळतात. १) गाण्याविषयी समाजात अभिरुची निर्माण व्हावी हे सांस्कृतिक कार्य त्यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालय संस्थेमार्फत करुन दाखवलं. २) जे जे नवं व चांगलं ऐकावयास मिळेल त्याचा शक्य असल्यास स्वतःच्या गायकीत समावेश करुन घेण्याची त्यांची तयारी असे. ३) खोटं बोलणं, वागणं , खोटे मानअपमान त्यांना कधी आवडले नाहीत. ते शेवटपर्यंत खरं काम करत राहिले. ४) संगीत प्रचार व प्रसारासाठी स्वतःजवळ वक्तृत्व हवं म्हणून स्वतःभाषेचा अभ्यास केला आणि हिंदी, ब्रज व मराठी भाषेवर प्रभूत्व मिळवलं. इतकंच नाही, तर संपूर्ण भारतातला श्रेष्ठ वक्त्यांत त्यांचं नाव घेतलं जात असे.
५) पलुस्करांची शिष्यशाखा संख्येने, गुणवत्तेने व कर्तृत्वाने खूप संपन्न होती.

पुढे विष्णू दिगंबर यांचा कर्तृत्वकाळ साधारणपणे ३४ वर्षाचा मानला तर एवढयाशा काळात किती अफाट काम त्यांनी उभं करुन ठेवलं आहे, याचा अंदाज येतो. त्यांच्या ग्रंथसंपदेमुळे आणि गांधर्व महाविद्यालयामुळे त्यांच्या मृत्यूनंतरच्या अनेक पिढया संगीताला जोडून राहू शकल्या. गांधर्व महाविद्यालय ही संस्थांही सुमारे शंभर वर्ष कार्यरत आहे. त्यावरुन विष्णू दिगंबरांच्या द्रष्टेपणाची झेप कळते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

गायक पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर (25-Oct-2021)

पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर (28-May-2017)

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (25-Oct-2016)




Listing
b - १९ ऑगस्ट १८७२
LS - Dead