(१८६० – १९३६)
भारतीय संगीताचे प्रगाढ पंडित असं विष्णू नारायण भातखंडे यांचं वर्णन करावं लागेल. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीतविषयक संशोधनाला आणि ग्रंथलेखनाला वाहिलं होतं. त्यांच्याएवढा श्रेष्ठ अभ्यासक भारतात विरळाचा म्हणावा लागेल.
पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी मुंबईत झाला. त्यांना संगीताची आवड त्यांच्या आईमुळे लागली. लहान असतांनाच त्यांनी बासरीवर हुकमत मिळवली होती व शाळाकॉलेजात बक्षिसंही मिळवली होती. १८९० साली त्यांनी वकिली सुरु केली व चांगला पैसाही मिळवला. परंतु पत्नी व मुलीच्या अकाली निधनामुळे त्यांनी स्वतःला संपूर्णपणे संगीताला वाहून घेतलं व वकिलीही बंद केली. पारशी मंडळींनी स्थापन केलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी‘त ते सामील झाले. १८८४ पासून धृपद शिक्षक रावजीबुवा बेलबागकर यांच्याकडे शिक्षण सुरु केलं. तिथे त्यांनी सुमारे ६०० धृपंद आत्मसात केली. ख्याल गायन शिक्षक महंमदखॉ आणि विलायत हुसेनखाँ यांच्याकडूनही त्यांनी ख्यालगायनाची विधिवत तालीम घेतली. त्यानंतर संपूर्ण भारतातील विद्येचा व शास्त्राचा एकसंध अभ्यास करावा हे त्यांनी मनोमन ठरवलं व त्या अभ्यासासाठी प्रथम त्यांनी दक्षिण भारताचा १९०४ साली दौरा केला. मद्रास, तंजावर, म्हैसूर, त्रावणकोर येथील विद्वज्जनांना भेटून चर्चा केली. इतकंच नाही , तर तिकडील उपलब्ध असलेले संगीतविषयक ग्रंथ त्यांनी वाचले. आणि चर्चेच्या व पुस्तकातील गोष्टींच्या नोदी त्यांनी करुन घेतल्या. नंतर गुजरात, काठीयावाड, राजस्थान, लाहोर, शिकारपूर इत्यादी ठिकाणी ते संगीताच्या अभ्यासाठी गेले. येते वेळी जगन्नाथपूरी, विजयनगर, हैदराबाद या शहरांनाही त्यांनी भेटी दिल्या. कुठेही भाषेची अडचण य नये म्हणून त्यांनी भाषाही शिकून घेतलेल्या होत्या. याच दौर्यात त्यांच्या संपूर्ण कार्यावर ज्या एका विद्वान अभ्यासकाची मुद्रा उमटलेली आहे, त्या हैदराबादच्या संस्कृत पंडित आप्पा तुळशी यांचं सानिध्य भातखंडे यांना लाभलं.
या दौर्यामध्ये भातखंडे यांना अनेक दुर्मिळ ग्रंथांचं करता आलं. काही ग्रंथांच्या त्यांनी नकलाही केल्या. विविध प्रदेशांतील विद्वान मंडळीच्या बरोबर ज्याप्रमाणे त्यांनी चर्चा केल्या, त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणच्या नामांकित गायकवादकांच्या मैफलीही ऐकल्या. केवळ या प्रकारच्या अभ्यासामुळेच त्यांना शास्त्र व कला या दोन्ही बाजू मनापासून लक्षात घेता आल्या. ‘लक्षसंगीत‘ हा स्वतःचा ग्रंथ त्यांनी संस्कृतात व श्लोकबध्द पध्दतीनेच लिहिलेला आहे. त्यामागे हा एवढा विचार व घटना होत्या.
पंडित भातखंडे यांच्या तात्विक, वैचारिक संगीतलिखाणाची सुरुवात काहीशी उशिरा म्हणजे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी झाली. तोपर्यंत त्यांनी मनन, चिंतन व अभ्यासलेल्या गोष्टींचं विश्लेषण पूर्णत्वाने केलेलं होतं, म्हणूनच त्यांच्या उशिरा सुरु झालेल्या लिखाणात परिपक्वता असल्याचं जाणवतं. गीतलेखनासाठी त्यांनी स्वतःची अशी स्वर-ताल लिपीही तयार केली होती. या लिपीचं स्थूल स्वरुप ‘गीतमालिका‘ नावाच्या छोटया छोटया भागांत त्यांनीच प्रकाशित केलेल्या पुस्तकातून दिसतं. विशेष म्हणजे ‘हिंदुस्थानी संगीत पध्दती‘ भाग एक ज्या वेळी प्रसिध्द झाला, तोपर्यंत म्हणजे १९१० पर्यंत ही लिपी अपूर्णावस्थेतच होती. पुढे ही स्वरलिपी आजच्या स्वरुपात व काहीशी पूर्णावस्थेत दिसते.
पंडित विष्णू नारायण भातखंडे अत्यंत व्यासंगी होते. सर्व ग्रंथालयात जाऊन तेथील संगीतग्रंथ त्यांनी पाहिले होते व काहींचा तर अभ्यासही केला होता. उर्दू व पर्शियन भाषा जाणणारे मुनशी ठेवून, त्या भाषांतील ग्रंथ त्यांनी समजावून घेतले होते. बरेचसे दुर्मिळ ग्रंथ त्यांनी छापून प्रसिध्द केले. निरनिराळया गवयांना मुंबईत आणून त्यांच्याकडून त्यांनी चिजा जमा केल्या होत्या. कोणी खाँसाहेब गंडा बांधल्याशिवाय शिकवत नाही म्हणाला, तर त्याचा गंडा बांधून त्याच्याकडून ज्ञान घेण्यास त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही.
पंडित भातखंडे यांचं लिखाणाचं कार्य बघितल्यावर आजही अभ्यासक थक्क होतात. या त्यांच्या कार्याआधी समाजात संस्कृत ग्रंथांची नावं सुध्दा माहीत नव्हती. भातखंडे त्यांच्यामुळे त्या त्या ग्रंथांची ओळख झाली व त्यामुळे मराठी अनुवादाने ते सुगम झाले. या अत्यंत उपयोगी ग्रंथांशिवाय त्यांनी शिक्षणक्षेत्रासाठीही संगीतांची आवश्यकता पटवून दिलेली आहे.
सन १९३५ साली पंडितजी आजारी पडले ते जवळजवळ वर्षभर अंथरुणावर खिळूनच होते. १९ सप्टेंबर १९३६ रोजी सकाळी मृत्यूने त्यांना गंधर्वलोकी नेलं. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारसमयी केवळ पाच -सात लोकच उपस्थित होते. भातखंडे यांनी आयुष्यभर संगीतशास्त्र लिखाणाचं अवघड काम केलं, परंतु त्यांचं थोरपण समकालीनांना कळलंच नाही, असं या प्रसंगावरुन वाटतं.