एक जाणकार लेखक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण तसच पक्षीविद्यातज्ज्ञ,आणि पुरातन वस्तुंचे अभ्यासक, असणारे चतुर्रस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल व्यंकटेश कामत.
विठ्ठल कामत यांच नाव घेताच डोळ्यासमोर उभी रहातात “सत्कार“, “ऑर्कीड” आणि “सम्राट” सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृह.
मराठी माणसांना उद्योगासाठी प्रेरणा मिळेल अशीच या मराठी उद्योजकाची ख्याती आणि किर्ती आहे. यासाठी अपार मेहनत, जिद्द, कल्पकता, उद्दमशीलता, तसच वेळप्रसंगी जबाबदारी घेण्याची वृत्ती आणि तयारी असावी हे विठ्ठल कामतांकडून निश्चितच शिकता येण्यासारखे गुण आहेत.
प्रयोगशील आणि अफाट कल्पना शक्ती लाभलेल्या विठ्ठल कामतांनी अतिशय नियोजनपूर्णतेनं उपहारगृह या संकल्पनेत अमूलाग्र बदल घडवून आणलेत आणि भारतीय उपहारगृहांना आधुनिक दर्जा देण्याचं श्रेय हे विठ्ठल कामतना जातं. कारण त्यांनी राबवलेल्या संकल्पनांना, आधुनिकतेसोबतच परंपरागत, आदरातिथ्याची उद्योगशीलतेची जोड होती.
हॉटेल उद्योग व्यतिरिक्त विठ्ठल कामतांनी पर्यावरणाला फायदेशीर ठरेल अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली आहे. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसंच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्यांचा मानस आहे. यासाठी “पाथरे गांव” सारख्या डोंगराळ भागात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवणं, आणि उल्लेख करावा अशा “फुलपाखरु उद्यानाची” समावेश करता येईल. “हरीण”, “कासव”, आणि दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. तसंच ओडिसा येथील “चिलिका तलाव” येथे “डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर” ची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कीड हॉटेल च्या परिसरामध्ये “राघु” आणि “चिऊ गल्ली” ची भारणी करुन वातावरणात अधिकाधिक नैसर्गिकता आणली आहे.
अनेक दुर्मिळ आणि प्राचीन वस्तु गोळा करण्याचा छंद असलेल्या विठ्ठल कामतांनी “मुंबई” आणि “जाधवगड” येथे “आई” या संग्रहालयाची उभारणी सुद्धा केलेली आहे, या संग्रहालयात “टाकाऊ पासून टिकाऊ” वस्तुंचा समावेश असून पर्यावरणाला पुरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी केला आहे.
विठ्ठल कामतांची “हॉटेल इंडस्ट्री” मधील कारकीर्द आणि “उद्योजक” म्हणून यशस्वी पणे वाटचाल केलेला प्रवास “उद्योजक होणारच मी” आणि “इडली ऑकिड आणि मी” या पुस्तकांमधुन वाचकांपर्यंत समोर आलेला ही दोन्ही पुस्तकं उद्योजक बनु इच्छिणार्या तरुणांसाठी, कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील अशीच आहेत.
विठ्ठल कामत हे “महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा” चे अध्यक्ष असून, “हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया” च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत; या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितींवर सल्लागार तसंच विविध पदांवर नियुक्त आहेत, त्यासोबतच “आय.आय.एम.” अहमदाबाद आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य कामत करत आहेत.
आत्तापर्यंत विठ्ठल कामत यांना शंभरापेक्षा ही जास्त राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यामध्ये “गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड”, “पाटवा इंटरनॅशनल अचिवर ॲवॉर्ड”, “राजीव गांधी एन्वायर्मेंट ॲवॉर्ड”, तर “ऑर्किड” साठी “इकोटेल” हा किताब मिळवण्याचा बहुमान विठ्ठल कामतांना जातो.
विठ्ठल कामत म्हणतात; “पर्यावरण माझी आवड” असून, वारसा हा माझा संप्रदाय, तर आदरातिथ्य करणं माझं जीवन आहे.“