२० जुलै १९४३
१९४३> तत्वचिंतक, कादंबरीकार, साहित्य समीक्षक वामन मल्हार जोशी यांचे निधन. “रागिणी ऊर्फ काव्यशास्त्रविनोद” ही त्यांची पहिलीच कादंबरी गाजली. त्यानंतरच्या कादंबर्यांपैकी “आश्रमहरिणी”, “नलिनी” व स्त्रीविषयक प्रश्नांची चर्चा, तर “सुशीलेचा देव” आधुनिक काळातील स्त्रीचे प्रगल्भ चित्र या कादंबरीतून रेखाटले, तर “इंदू काळे, सरला भोळे” या पत्रात्मक कादंबरीतून विवाह, घटस्फोट यांवर मते व्यक्त केली.
——————————————————————————————————–
वामन मल्हार जोशी
From Aniket Joshi
वामन मल्हार जोशी यांनी सत्य, सौंदर्य, आणि सौजन्याची साहित्यविचारामध्ये प्रतिष्ठापना करणारे लेखक अशी ओळख मिळविली. तत्वचिंतक, गंभीर परंतु प्रसन्न असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी, १८८२ रोजी तळे येथे त्यांच्या आजोळी झाला. वडिल मल्हारपंत जोशी हे व्यवसायाने याज्ञिकी होते. लहानवयातच पितृछत्र हरवल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण गोरेगाव येथे झाले. पुढील शिक्षण पुणे व अहमदनगरमध्ये झाले. १९०० साली ते अहमदनगर हायस्कुलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली. तर्कशास्त्र व तत्वज्ञान हे विषय घेवून ते एम. ए. झाले. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमीत्तने आण्णासाहेब विजापूरकरांशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर विजापूरकरांच्या समर्थ विद्यालयात ते रुजू झाले. विजापूरकरांच्या विश्ववृत्त मासिकाच्या संपादक पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. यातील एका लेखामुळे विजापूरकर, वामनराव, आणि विनायकरावांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरचा काही काळ अडचणीत गेला. मासिकही बंद पडले होते. धोंडो केशव कर्वे ह्यांच्या हिंगणे येथील महिला पाठशाळा विद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यानंतर त्यांच्या लेखणीने वेग घेतला. वामन जोशींच्या लेखणीला फुटलेली पालवी ही समस्त स्त्री वर्गाच्या भविष्यातील क्रांतीची नांदी झाली. कारण त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून महिलांवर होणार्या असंख्य अत्याचारांना तोंड फोडले. त्यांच्या कादंबर्यांमधून आपल्याला सामान्य भारतीय महिलेचे भावविश्व, तिचे प्रश्न, व तिच्या समस्या अनुभवयाला मिळाल्या. रागिणी ही त्यांची पहिली कादंबरी. आश्रमहरिणी, नलिनी, रागणी या तिनही कादंबर्यांमधून त्यांनी स्त्रीविषयी चर्चा केली. सुशिलेचा देव यात व्यापक व उदात्त दृष्टीकोन असणार्या सुशिलेचे व्यक्तिमत्व त्यांनी रेखाटले. इंदू काळे सरला भोळे या कादंबरीत त्यांचे पत्रात्मक लेखन आढळते. नवपुष्पकरंडक, विस्तवाशी खेळ, नितिशास्त्र प्रवेश, सॉक्रेटिसचे संवाद, विचारविला, विचारलहरी, विचारविहार आदी त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे. साहित्यीक म्हणून सर्वमान्यता मिळविलेल्या जोशींचे १९४३ साली निधन झाले.
mss