यशवंत देव

Yashwant Deo


सुंदर शब्दांना अर्थवाही स्वररचना करण्याची कल्पना मराठी माणसाची आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकाच्या निमित्ताने शब्द आणि स्वर यांचा एक शुभसंकर घडून आला. नाटकातील कथानक पुढे नेण्यासाठी काव्याचा आधार घेताना त्या काव्याला सुरेल करण्याचे कसब अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी दाखवले आणि नाटय़संगीत नावाची एक अजब गोष्ट या भूतलावर अवतरली.

त्याचाच अधिक अभिजात आविष्कार भावगीताच्या रूपाने मराठीतच विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात जी. एन. जोशी यांच्यासारख्या प्रतिभावंताने साकार केला. या भावगीताच्या विश्वातील तळपता तारा म्हणून ज्या मोजक्या संगीतकारांची नावे घ्यावी लागतील, त्यामध्ये यशवंत देव यांचे नाव फार वरचे आहे, यात शंकाच नाही.

जनकवी पी. सावळाराम यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्यांना जाहीर झाला ही त्यांच्या कारकीर्दीवर उमटवलेली आणखी एक सुवर्णमोहोर म्हणावी लागेल. ‘शब्दप्रधान गायकी’ या शीर्षकाचे पुस्तक लिहून देवांनी आपल्या कर्तृत्वाला अभ्यासाची जोड दिली आहे. आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी करणे हे ज्या काळात आनंदी जगण्याचे ठिकाण होते, त्या काळात देवांनी आपल्या प्रतिभेला नवे पंख फुटू दिले. कवितेला जन्मत: लाभलेले स्वरांचे अस्तर सहजपणे जाणवण्याची क्षमता यशवंत देव यांना होती. त्यामुळेच कविता रसिकांपर्यंत आणखी सुरेल करून नेण्याचे काम त्यांनी केले.

गजानन वाटवे, सुधीर फडके, वसंत पवार, वसंत प्रभू अशा कलावंतांच्या परंपरेत राहून आपले स्वत्व जपण्याचे कसब देवांपाशी होते. त्यामुळेच त्यांची कितीतरी गाणी आजही ऐकताना मन आनंदाने भरून जाते. संगीतकाराला कविता आकळावी लागते. त्याशिवाय त्या शब्दांना स्वरांच्या मदतीने प्रवाही करणे शक्य होत नाही. देवांनी आयुष्यभर शब्दांची साथ सोडली नाही. स्वत: उत्तम कवी असल्याने त्यांनी संगीतकार म्हणून केलेली कामगिरी अधिक उठावदार आहे, यात वादच नाही. स्वत: पुलंनी त्यांच्या ‘झालं गेलं विसरून जा’ या चित्रपटासाठी देवांना गीतं लिहायला सांगितली होती!

घरात संगीताला पोषक वातावरण! वडील सतार वाजवायचे. पण म्हणून संगीताचे पद्धतशीर शिक्षण काही झाले नाही. तशी गरजही वाटली नाही. पण तरीही पुण्यात शिकत असताना पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे जाऊन ‘माझे गाणे ऐका आणि सर्टिफिकेट द्या’ असे म्हणण्याचे आणि ते मिळवण्याचे धैर्य यशवंत देवांपाशी होते.

आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून प्रवेश केलेल्या देवांनी तिथे संगीतात अक्षरश: धम्माल उडवून दिली. श्रुतिकांपासून ते संगीतिकांपर्यंत आणि भावगीतांपासून ते पाश्र्वसंगीतापर्यंत सर्वत्र देवांनी आपली एक सर्जनशील छाप उमटवली. त्या काळात त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवर अतिशय लोकप्रिय झाला होता. गीतानं रसिकांच्या हृदयाशी संवाद साधला पाहिजे, नुसता सुरांचा गोडवा पुरेसा नाही, हे त्यांचे मत त्यांच्या संगीतरचनांमधून नेहमीच जाणवत राहते. संगीतासारख्या अथांग समुद्रात शब्दांच्या साहाय्याने डुबकी मारणाऱ्या देवांचे ओशो यांच्याबद्दलचे प्रेम सगळय़ांनाच आश्चर्यकारक वाटत आले आहे. पण आयुष्यात सुखाच्या पलीकडे जाऊन काही मिळवण्याच्या धडपडीतून हे सारे घडले, असे त्यांचे म्हणणे असते. ‘विसरशील खास मला’, ‘काही बोलायाचे आहे.’, ‘स्वर आले दुरुनि’, ‘कोण येणार गं पाहुणे’, अशी त्यांची कितीतरी गाणी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. सोप्या आणि गोड चाली लावणारे यशवंत देव शब्दांशी कधी मस्ती करत नसत.

यशवंत देव यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव (1-Nov-2016)

जेष्ठ संगीतकार यशवंत देव (12-Nov-2017)

मराठी संगीत विश्वातील ‘देव’ अशी ओळख असलेले यशवंत देव (31-Oct-2018)

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव (1-Nov-2019)