मृत्यू- मार्च २०, १९५६
बा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते.
अंतरविरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेले मानवी जीवनातील व वर्तमान परिस्थितीतील अस्वस्थता सतत व्यक्त करणारी मर्ढेकरांची कविता तिच्या जन्मापासून आजपर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. काव्यातील नवीनता ही संकल्पना त्यांनी स्वतःच्या कवितेतून साहित्यात तर रूजवलीच पण समीक्षेतही तिला स्थान मिळवून दिले. त्यांच्या कवितेतील नावीन्याच्या अभिव्यक्तीमुळे ते नवकवितेचे प्रवर्तक ठरले. ज्यांच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले ते म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. मर्ढेकरांचा जन्म खानदेशात फैजपूर येथे १ डिसेंबर १९०९ रोजी झाला.
सातारा जिल्ह्यातील मर्ढे हे मर्ढेकरांच्या घराण्याचे मूळगाव. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली. १९३४ साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात काही दिवस त्यांनी नोकरी केली. पुढे मात्र एलफिस्टन महाविद्यालय, ईस्माइल युसूफ कॉलेज आणि सीडन हॅम कॉलेज अशा मुंबईच्या महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले; पण १९३८ ला ते आकाशवाणी केंद्रात रूजू झाले. त्यांचे लेखन १९३० च्या सुमारास सुरू झाले. पहिली कविता ‘शिशिरर्तुच्या पुनरागमी’ ही रत्नाकर मासिकात प्रसिद्ध झाली. मर्ढेकरांचा पहिला संग्रह ‘शिशिरागम त्यानंतर ‘तांबडी माती’, ‘रात्रीचा दिवस’, ‘पाणी’ या कादंबर्या ‘काही कविता’ ‘आणखी काही कविता’, ‘सौंदर्य आणि साहित्य’ इ. लेखन प्रसिद्ध झाले. मर्ढेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा व नव्या युगाची जाणीव व्यक्त करणारे होते. ‘पिपात मेले’, ‘त्रुटीत जीवन’, ‘फलाटदादा’, ‘काळ्या बंबाळ अंधारी’, ‘गोंधळलेल्या अन् चिचोळ्या’, ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या’ या मर्ढेकरांच्या गाजलेल्या कविता.
प्रकाशित साहित्य
मर्ढेकरांची कवितान (कविता संग्रह) – मौज प्रकाशन
रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी (एकत्र प्रकाशीत कादंबरी) – मौज प्रकाशन
सौंदर्य आणि साहित्य – मौज प्रकाशन
कला आणि मानव – मौज प्रकाशन
मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार ‘सौंदर्य आणि साहित्य’ साठी प्रदान करण्यात आला.