एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते . अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने २००५ साली ‘ मॅन ऑफ द इयर ‘ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता, यावरून त्यांच्या कार्याची केवढी मोठी दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ते लक्षात यावे.
त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ७ मार्च १९२८ रोजी झाला. ते नागपूर विद्यापीठातून एम.ए.पीएच.डी. झाले.
नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले जोशी यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला . त्यांना अनेक मानसन्मान मिळाले . जोशी संस्कृतचे विद्वान होते . त्यांचा प्राचीन, अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता. विपरीत परिस्थितीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले . त्यांनी नागपूर विद्यापीठातून एम . ए . केले व त्यानंतर पीएच . डी . केले . बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते .
अतिशय विनोदी स्वभावाचे डॉ . जोशी शाब्दिक कोट्या करायचे . हातात घेतलेले काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव होता . जोशी यांचे व्यक्तिमत्त्व मेहनती , जिद्दी व लढाऊ होते . त्यांनी शारीरिक भाष्यावरील विश्लेषण , अभिनवम् शास्त्रत्रिदलम् या पुस्तकांसह नीलकंठविजयम् व रहस्यमयी या नाटिकाही लिहिल्या . कम्प्युटर ज्या लॉजिकवर चालतो त्या ‘ लॉजिक ‘ वर आधारित त्यांचे पुस्तक ‘ न्यायसिद्धांत मुक्तावली ‘ खूपच गाजले . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच . डी . साठी मार्गदर्शन केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . पंकज चांदे , प्रभाकर आग्रे , डॉ . सुनीती आफळे , हर्षिदा दवे , डॉ . अनुपमा डोंगरे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात घडले , मोठे झाले .
डॉ . जोशी यांच्या कार्याची दखल घेत १९८९ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान केला . ज्ञान प्रबोधिनी पुणे , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ , देवदेवेश्वर संस्थान , जयपूरची संस्कृत सेवा परिषद , श्रुंगेरी पीठ आदींचेही पुरस्कार त्यांना मिळाले . २००९ साली त्यांना राष्ट्रपती मिळाला . साहित्याचार्य , काव्यतीर्थ , साहित्योत्तम आणि संपूर्णदर्शनमध्यमा अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या . संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे तरुण मध्यभारतात भरपूर आहेत पण ज्येष्ठ व विद्वान मंडळीची संख्या फार कमी आहे . त्यामुळे संस्कृत पंडित , साहित्याचार्य डॉ . जोशी यांचे महत्त्व संस्कृत भाषिकांना अधिक होते .
दीर्घ आजारानंतर त्यांचे नागपूर येथे १२ जून २०१२ रोजी निधन झाले.